अभिनेत्रींच्या गळयात मंगळसूत्र पाहून चाहते म्हणाले अगं लग्नं कधी झालं? मग पतीसोबतचा फोटो शेअर करत दिला सुखद धक्का

अभिनेत्रीचं लग्न हा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय असतो. आपल्या आवडत्या नटीनं तिच्या लग्नाची बातमी अचानक दिली तर चाहत्यांच्या काळजाला किती भेगा पडतात हे त्या चाहत्यांनाच माहित. काही चाहत्यांना मात्र अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी ऐकून सुखद धक्का बसतो तर काही चाहते तिला हक्काने प्रश्न विचारतात. अभिनेत्री कुंजिका काळवींट हिला सध्या तिच्या चाहत्यांच्या अशाच प्रश्नांना उत्तरं देण्याची वेळ आली आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय. हे फोटो कोणत्याही मालिकेतील लुकचे नसून कुंजिकाच्या खऱ्या आयुष्यातील आहेत.

त्यामुळे अगं, तुझं लग्नं कधी झालं असं म्हणत चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा पाऊस पाडला आहे. ती परत आलीय या मालिकेमुळे कुंजिका घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची सायलीची भूमिका खूप लोकप्रिय झाली. कुंजिकाने पहिल्यांदाच हॉरर मालिकेत काम केलं आणि तो मूड तिने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. याआधी कुंजिकाने स्वामिनी या ऐतिहासिक मालिकेत आनंदीबाईंची भूमिकाही उत्तररित्या साकारली. या मालिकेतील तिचा लुकही तिच्या चाहत्यांना आवडला होता. तर चंद्र आहे साक्षीला या मालिकेतील कुंजिकाची भूमिका लक्षवेधी होती. सौंदर्यस्पर्धेतून विजेती झालेल्या कुंजिकाला अभिनय, मॉडेलिंग याच क्षेत्रात करिअर करायचं होतं. त्यादृष्टीने कुंजिका अभिनयक्षेत्रात आली. कुंजिकाने कमी वेळेत चांगल्या भूमिका करून चाहत्यांचं प्रेम मिळवलं आहे. कुंजिका सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. फोटो, व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांशी संवाद साधत असते. पण एक गोष्ट मात्र तिने गेल्या काही दिवसांपासून लपवून ठेवली होती. सोशलमीडियातूनच ती उघड झाल्याने सध्या कुंजिका चर्चेत आहे.

कुंजिकाने तिच्या सोशलमीडियावर असे काही फोटो पोस्ट केले आहेत की ज्यामध्ये तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. फोटोवरून ते नवराबायको असल्याचंही स्पष्ट होतय. यावरूनच कुंजिकाच्या चाहत्यांना तिचं लग्नं झाल्याचा अंदाज आला. अगं तुझं लग्नं झालय का,? तुझं लग्न कधी झालं असे प्रश्न कमेंटमध्ये विचारले आहेत. त्यावर कुंजिकानेही होकार दिल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. कुंजिकाच्या नवऱ्याचं नाव निखिल काळवींट असं आहे. तो कॉम्प्युटर इंजिनीअर असून त्याचा कुंजिकाच्या अभिनयाला पूर्ण पाठिंबा आहे. कुंजिकाचं लग्नं झालय हे तिच्या चाहत्यांना आजपर्यंत माहितीच नव्हतं, पण आता कुंजिकाने नवऱ्यासोबतचेच फोटो शेअर केल्याने काही चाहते अभिनंदन करत आहेत काही चाहत्यांच्या हृदयाचे तुकडे झाले आहेत.