कलाकारांनी गेल्या दोन वर्षात अनेक कटू अनुभव सोसले आहेत. सामान्य माणसांप्रमाणे त्यांनाही या संकटांना सामोरं जावं लागतं हे त्यांनी शेअर केलेल्या भावनांमधून दिसत असतं. अनेकदा शो मस्ट गो ऑन म्हणत जवळच्या व्यक्तींना दुरावण्याचं दु:ख कलाकारांना पचवावं लागतं. कलाकारांपैकी कुणी आपले आईवडील गमावले तर कुणी जीवनसाथी. प्रेक्षकांचं मनोरंजन करून जबाबदारी पार पाडल्यानंतर जेव्हा हे कलाकार एकांतात त्यांचा वेळ घालवत असतात तेव्हा त्यांच्यापासून दुरावलेल्या नात्यातील आठवणींच्या खपल्या निघतात. अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने तिच्या सोशलमीडियावर शेअर केलेल्या एका भावुक पोस्टमधून कलाकारांचं हळवं मन पुन्हा एकदा समोर आलं आहे. केतकीने तिच्या भावासाठी ही पोस्ट लिहिली आहे ज्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.

केतकीचा चुलत भाऊ अक्षय माटेगावकर याने १५ जुलै रोजी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. अवघ्या विशीच्या उंबरठ्यावर त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला. इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण घेतलेल्या अक्षयने त्याच्या सुसाइट नोटमध्ये, नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होतं. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी टाकून त्याने आयुष्य संपवलं. अक्षयच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही त्याचे आईवडील आणि कुटुंब बाहेर आलेलं नाही. अक्षयने त्याच्या नोटमध्ये असंही म्हटलं होतं की, आईबाबा, मी तुमची स्वप्नं आणि माझं ध्येय पूर्ण करू शकलो नाही. याच वाक्यावरून केतकीने अक्षयसाठी पोस्ट लिहिल्याचं दिसत आहे. केतकी आणि अक्षय हे चुलतभाऊ असले तरी त्यांच्यात खूप छान बाँडिंग असल्याचं केतकीच्या या पोस्टमधील ओळींमध्ये दिसत आहे. केतकीने भावासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलय की, तुझ्यासारखा सुस्वभावी, समंजस, अष्टपैलू, मेहनती भाऊ मला मिळाला. आता तू नाहीस. पण काय लिहू, किती लिहू असं झालय. २१ वर्षे आपण सोबत होतो. गेल्या १५ दिवसांपासून मी फक्त आपण एकत्र घालवलेले क्षण आठवतेय. किती आठवणी आहेत आपल्या एकत्र. तू अभ्यास करून माझा रियाज ऐकत बसायचास. ठुमरी, गझल ऐकताना तू दंग व्हायचास. अक्षू, गझल, ठुमरी, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत यामध्ये तुला कितीतरी आवड होती.

तू गायचा नाहीस पण खूप छान श्रोता होतास माझा अक्षू. घरी असताना मजा, चेष्टा करणारा अक्षू आता सोबत नाही हे स्वीकारणं खूप अवघड आहे. केतकीने पुढं असं लिहिलं आहे की, अक्षु, तुझी मॅच्युरिटी लेव्हल आणि हुशारी खूपच भारी होती. पण तुझी केतकी ताई म्हणून एक गोष्ट सांगते, आयुष्यात कुठलीही गोष्ट, ध्येय, स्वप्न, विचार हे आपल्या स्वत:पेक्षा मोठे नसतात. आणि ते मोठे होऊही द्यायचे नसतात. आपण आहोत म्हणून त्यांना आस्तित्व आहे. तू मला सोडून गेलास पण तू आमच्यासोबत कायम आहेस आणि राहशील. केतकीने अक्षयसाठी लिहिलेल्या या पोस्टमुळे भाऊबहिणीचं नातं तर तिच्या चाहत्यांना समजलं आहेच पण अक्षयने ज्या कारणासाठी आत्महत्या केली त्यामुळे अजून कोणी असं टोकाचं पाऊल उचलू नये या हेतूनेही केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.