मराठी बिग बॉसचा चौथा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली होती. मराठी बिग बॉसचा शो स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या टास्कमुळे वाद घडवून आणतात. त्यामुळे आपली इमेज राखण्यासाठी बहुतेक कलाकार मंडळी यामध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या ऑफर धुडकावून लावतात. काही माध्यमानी शोमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची संभाव्य यादी जाहीर केली आहे. त्यात केतकी चितळेचे देखील नाव घेण्यात येते. मात्र बिग बॉसच्या शोमध्ये येण्यासाठी केतकी चितळे उत्सुक नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

‘मी बिग बॉस सारख्या कार्यक्रमांना पाठिंबा देत नाही हे मी बरोबर एक वर्षापूर्वी स्पष्ट केलं होतं. अशा नकारात्मकता पसरवणाऱ्या कार्यक्रमाचे मी समर्थन करत नाही. अशा माणसांवर प्रयोग करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणं म्हणजे मी माझा दर्जा कमी करून घेणं आहे. पैशासाठी मी माझा दर्जा कमी करून घेऊ इच्छित नाही’. केतकी चितळे हिने मराठी मालिकांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मात्र एपिलेप्सीचा त्रास होत असल्याने तिला तडकाफडकी मालिकेतून काढून टाकण्यात आले होते असा आरोप तिने त्यावेळी मालिकेच्या टीमवर लावला होता. यानंतर केतकी फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. परंतु आपल्या आजाराबाबत ती इतरांना नेहमी मार्गदर्शन करताना दिसते. आपल्या बेधडक वक्त्याव्यांमुळे केतकी वादाच्या भोवऱ्यात नेहमीच अडकलेली पाहायला मिळाली आहे. अगदी शेजाऱ्यांशी होणारे भांडण असो वा फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टमुळे झालेली अटक यामुळे केतकी चितळे हे नाव मीडिया माध्यमातून नेहमीच चर्चेत येत आहे.

त्यामुळे तीला मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात निश्चितच आमंत्रित केले जाईल असे बोलले जात होते. केतकी या शोमध्ये आल्यावर नक्कीच राडा होईल आणि हा शो टीआरपीचा उच्चांक गाठेल असे मत व्यक्त केले जात आहे मात्र बिग बॉसच्या घरात जाऊन मी माझी किंमत कमी करून घेऊ इच्छित नाही असे स्पष्ट मत तिने या शोबाबत दिले आहे. त्यामुळे बिग बॉससारख्या शोमध्ये केतकी दिसणार नाही असे तूर्तास तरी पाहायला मिळत आहे. केतकी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक नसली तरी ती पुढे असेही म्हणते की ‘ज्यांनी ज्यांनी मला बिग बॉसच्या घरात जाण्याबाबत विचारले होते त्यांनी एपिलेप्सी संशोधनात १ रुपये दान करावे तसेच वृत्तमाध्यमांनी माझं नाव छापलं तर त्यांनी देखील एक हजार रुपये दान करावेत’.