Breaking News
Home / जरा हटके / कविता मेढेकर आणि संकर्षण कऱ्हाडे करणार प्रशांत दामले यांची पोलखोल

कविता मेढेकर आणि संकर्षण कऱ्हाडे करणार प्रशांत दामले यांची पोलखोल

झी मराठीवरील किचन कल्लाकारच्या मंचावर आज ही परी अस्मानीची फेम कविता मेढेकर, किशोरी शहाणे आणि सोनाली कुलकर्णी या अभिनेत्री हजेरी लावणार आहेत. मंचावर येऊन या अभिनेत्री धमाल किस्से शेअर करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे कविता मेढेकर आणि प्रशांत दामले यांनी अनेक वर्षे नाटकांमधून एकत्रित काम केले आहे त्यामुळे प्रशांत दामले यांच्या स्वभावाची एक वेगळी ओळख त्या या मंचावर करून देणार आहेत. त्यांच्यासोबतचे धमाल किस्से ऐकायला प्रेक्षक आजच्या भागाची मात्र तितक्याच आतुरतेने वाट पाहणार आहेत हे नक्की.

actress kavita medhekar in kitchen kallakar
actress kavita medhekar in kitchen kallakar

प्रशांत दामले स्वभावाने जितके मिश्किल तितकाच त्यांचा विसरभोळा स्वभाव मात्र सहकलाकारांसाठी गोंधळून सोडणारा आहे. प्रशांत दामले यांना विसरण्याची भयंकर सवय आहे. कुणाची नावं विसरणे तर कधी कधी गाण्यातील शब्दच विसरणे ह्या प्रशांत दामले यांच्या गोष्टी आता कविता आणि संकर्षण मंचावर सांगताना उलगडणार आहेत. कविता मेढेकर यावेळी सांगताना म्हणाल्या की, प्रशांत नावं विसरतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. एका नाटकाच्या प्रयोगाला मी मेकअप करायला बसले होते त्यावेळी प्रशांत फोनवर कोणाशीतरी बोलत होता. त्यावेळी आपले हे आहेत ना ते आपले हे… असे म्हणत तो नावच सांगायचं विसरला. शेवटी सतीश असे म्हटल्यावर हा हा म्हणत समोरून त्याला सतिशचे आडनाव विचारले त्यावेळी मी त्याचे आडनाव थत्ते असल्याचे सांगितले मात्र त्यानंतर खबरदार तू हा किस्सा कोणाला संगीतलास तर असे प्रशांत दामले यांनी मला बजावून सांगितले होते. कविताचा हा किस्सा संपतो न संपतो तोच संकर्षण आणखी एक किस्सा सांगण्यास सज्ज होतो. साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या प्रयोगात संकर्षण प्रशांत दामले सोबत काम करत होता. संकर्षणने या नाटकात प्रशांत दामले यांच्या होणाऱ्या जावयाची भूमिका साकारलेली असते. एकदा परदेश दौऱ्यात असताना नाटकाच्या प्रॉपर्टीची तयारी संकर्षण करत होता. ‘सूर जुळावे जगण्यामधले…’ हे गाणं प्रशांत दामले यांना पाठ नव्हतं.

actor sankarshan karhade and prashant damle
actor sankarshan karhade and prashant damle

ते गाणं लिहून हार्मोनियम जवळ ठेवायचे होते मात्र ही चिठ्ठी लिहून ठेवायला संकर्षण विसरून जातो. नाटक सुरू होतं त्याचा शेवट जवळ येतो आणि प्रशांत दामले हार्मोनियम जवळ येऊन बसतात पण त्यांना गाणं लिहिलेली चिठ्ठी तिथे सापडत नसते. गाण्याचे ध्रुव पद होईपर्यंत ते संकर्षणला अनेक प्रकारे खुणावत तू चिठ्ठी ठेवायला विसरलास हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आपण काय खुणावतोय हेच मुळात संकर्षणला कळत नव्हते शेवटी ध्रुवपद संपल्यावर मधल्या वेळेत त्यांनी पेटी सोडून दिली आणि ढळढळीत आवाजात म्हणाले ‘बाळ जरा शब्द आणतोस का’…प्रशांत दामले यांचा हा किस्सा मात्र उपस्थितांना लोटपोट करून सोडणारा ठरला आहे. तेव्हा प्रशांत दामले यांची पोलखोल कशी केली जाते हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील याची खात्री आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *