गेले काही दिवस इंस्टाग्राम किंवा फेसबुक उघडले की, पहिले कॅटरीना कैफ आणि विकी कौशल या दोघांच्या लग्नाची चर्चा दिसत होती. अशात बऱ्याच काळापासून बहुप्रतिक्षित असलेल्या या दोघांच्या लग्नाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. विकी आणि कॅटरीना दोघांनीही एमेकांबरोबर आयुष्य जगण्याचा ठाम निर्णय घेत लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले असताना यामध्ये या दोघांचे लग्न कुठे होणार, लग्नाला किती व्यक्ती उपस्थित राहणार एवढंच नाही, तर जेवणात कोणते पदार्थ असणार या विषयी देखील चर्चा सुरू होती.

अशात दोघांनीही गुरुवारी ( ९ डिसेंबर) रोजी विवाह केला आहे. विकीने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. लग्नानंतर आता या दोघांचे शाही थाटातील लग्न सोहळ्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॅटरीनाने लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. तसेच विकीने क्रीम रंगाची शेरवानी आणि फेटा घातला आहे. विकीने लग्नातील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला या क्षणापर्यंत आणलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आमच्या अंतःकरणात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे. आम्ही एकत्र या नवीन प्रवासाची सुरुवात करताना तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मागत आहोत.” ६ डिसेंबर रोजी हे दोघे आपल्या कुटुंबीयांसह राजस्थानमधील एका प्राचीन किल्ल्याजवळ असलेल्या भव्य रिसॉर्टमध्ये पोहचले होते. त्यानंतर सर्व विधी आणि रीतीरिवाज सुरू झाले. ८ डिसेंबरला दोघांना हळद लावण्यात आली.

त्यानंर आज ९ डिसेंबरला दोघांनी एकमेकांसह सात फेरे घेत प्रत्येक परिस्थितीत एकमेकांबरोबर राहण्याचे वचन दिले. कॅटरीनाने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघांच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास विकीने ‘लव्ह Shuv Tey चिकन खुराणा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर त्याने मसान, जुबान, राजी, संजू अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याचा उरी द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट चांगलाच गाजला. कॅटरीनाच्या अभिनयाविषयी बोलायचं झाल्यास तिने पार्टनर, अग्निपथ, एक था टायगर, झिरो, सूर्यवंशी असे अनेक हिट चित्रपट या सिनेसृष्टीला दिले आहेत. तसेच लवकरच ती फोन भूत, टायगर ३ आणि जी ले झारा या आगामी चित्रपटांत देखील झळकणार आहे.