गेल्या काही दिवसांपासून मराठी सृष्टीत लग्नसोहळ्याला उधाण आलेले पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. याच महिन्यात महाराष्ट्राची क्रश आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचे देखील लग्न होणार असे वर्तवले जात होते. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाची टीम नुकतीच दुबईला गेली होती. हृतासह अन्य कलाकार नुकतेच नाटकाच्या दौऱ्याहून परतले आहेत. त्यात आता हृताच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी हृताचा होणारा नवरा म्हणजेच प्रतीकने हृतासाठी एक खास पोस्ट लिहिली होती तिच्या यशस्वी वाटचालीसाठी त्याने तिला शुभेच्छा दिल्या होत्या मात्र हृताची त्यावरील कमेंट चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली. ‘Cant wait’ ही तिची त्यावरील कमेंट लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत देऊन गेली. त्यानंतर मन उडू उडू झालं मालिकेतील कलाकारांनी देखील हृताच्या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मन उडू उडू झालं या मालिकेतील कार्तिक आणि सानिका म्हणजेच अभिनेता ऋतुराज फडके आणि रिना अगरवाल यांनी हृता आणि प्रतीकच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. हृता आणि प्रतीक आज १८ मे २०२२ रोजीच लग्नबांधनात अडकले आहेत. हृता आणि प्रतिकने आपल्या लग्नाबाबत जाहीर करणे टाळलेले पाहायला मिळाले. अर्थात लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नयेत याचीच खबरदारी म्हणून त्यांनी ही बातमी जाहीर केली नव्हती. मात्र आता हृताचा लग्नसोहळ्याचा खास फोटो व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी २४ डिसेंबर २०२१ रोजी हृता आणि प्रतीक शाह यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर हे दोघेही आपापल्या कामात व्यस्त असलेले पाहायला मिळाले.

काही दिवसांपूर्वी मन उडू उडू झालं मालिकेच्या सेटवर हृताचा आणि निर्मिती टीमचा सेटवरील स्वच्छतेच्या कारणावरून वाद झाला होता मात्र त्यानंतर हृता ही मालिका सोडणार असे बोलले जात होते परंतु मीडियाला दिलेल्या मुलाखतीत हृताने मालिका सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र लग्नासाठी ती मालिकेतून ब्रेक घेणार असे सांगितले जात होते. आणि आता मालिकेच्या कलाकारांनीच हृताच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर करून या बातमीला दुजोरा दिलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आता हृताचा तिच्या लग्नातील लूक पाहून तिच्या तमाम चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. त्यांच्या लग्नाला मराठी तसेच हिंदी मालिका सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह या नवदाम्पत्यांना खूप खूप शुभेच्छा!