
टीव्हीक्षेत्रातील एक लोकप्रिय चेहरा, मिलियन फॉलोअर्स असलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे सोशल मीडियावर हिट आहे. आजवर केवळ तीन मालिका, एक नाटक आणि एक वेबसिरीज असा तिचा प्रवास आहे. पण आपल्या उत्तम अभिनयाने ऋताने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ती स्वत:ही सोशल मीडियावर सतत अक्टीव्ह असते. हिंदी दिग्दर्शक प्रतीक शहासोबत ती लवकरच लग्नही करणार आहे. पण सध्या मात्र ऋताची चर्चा सुरू आहे ती मन उडू उडू झालं ही मालिका ती सोडत असल्याच्या बातमीने. ऐन रंगात आलेली ही मालिका दीपू आणि इंद्रा यांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झाली आहे. आणि या वळणावर ऋता मालिका सोडत असल्याची बातमी धडकल्यामुळे ऋताच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

पण आता खुद्द ऋतानेच ही मालिका सोडत नसून मी शूटिंग करत आहे. या अफवेवर विश्वास ठेवू नका असे सांगितल्याने तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेल्या आठवड्यातच ऋता मन उडू उडू झालं ही मालिका सोडत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता कुठे या मालिकेत दीपू आणि इंद्रा यांची प्रेमकहाणी बहरात आली आहे. या दोघांच्या नात्याविषयी दीपूची आई मालती यांना समजल्याने त्यांनी तिला इंद्राला भेटण्यापासून अटकाव केला आहे. तर तिकडे इंद्राही दीपूला भेटण्यासाठी आतूर आहे. इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा हा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशा वळणावर ऋता या मालिकेतून बाहेर पडत असल्याची बातमी ऐकून चाहते नाराज झाले होते. या मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने याबाबत ऋताने वारंवार निर्मितीटीमला सांगितले होते. त्याची दखल न घेतल्याने ऋता आणि निर्मिती टीमचा वाद झाला होता. अस्वच्छतेच्या कारणामुळे झालेल्या वादातून ऋताने मालिकेला रामराम केला अशी माहिती सोशल मीडियाद्वारे समोर आली होती.

मात्र आता ऋतानेच या माहितीचे खंडन केलं आहे. मुळात असा कोणताही वाद निर्मिती टीमशी झाला नव्हता असंही ऋताने तिच्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. त्यामुळे वादाची बातमीही खोटी आहे आणि मी मालिका सोडत असल्याचीही अफवा आहे असं ऋताने सांगितलं आहे. ऋता आणि प्रतीक शहा यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला असून या महिन्यात ही जोडी लग्न करणार आहे. दुर्वा या मालिकेतून ऋताने अभिनयात पाऊल टाकलं. फुलपाखरू ही तिची मालिकाही खूप गाजली होती. यशोमान आपटे सोबत तिची जोडी प्रेक्षकांना आवडली. दादा एक गुड न्यूज आहे हे नाटकही सध्या ती करत आहे. सिंगर सुपरस्टार या शोचे निवेदनही ऋताने केले होते. लवकरच तिचा अनन्या हा पहिला सिनेमा मोठया पडदयावर येणार आहे.