मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही क्षेत्रात हृता दुर्गुळे हिने आपल्या सहजसुंदर अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. इन्स्टग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी ती मराठी सृष्टीतील पहिली अभिनेत्री ठरली आहे. लवकरच हृता अभिनित करत असलेली मन उडू उडू झालं ही झी मराठी वरची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी तू चाल पुढं ही नव्या दमाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृताच्या फॅन्ससाठी आणखी एक खेदाची बाब म्हणजे या मालिकेसोबतच हृताने नाटकातून देखील काढता पाय घेतला आहे.

‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक आजही नाट्यगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचून आणताना पाहायला मिळते. या नाटकात उमेश कामत, हृता दुर्गुळे, अशुतोष गोखले आणि आरती मोरे झळकले आहेत. हे नाटक गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हृताने या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. नुकतेच दुबईला या नाटकाचे प्रयोग करण्यात आले होते त्यावेळी दुबईतील प्रेक्षकांनी या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद दिला. मात्र आता हृता या नाटकाचा भाग नसणार आहे. या नाटकाचे पोस्टर नुकतेच बदलण्यात आले त्यात हृताच्या जागी मृगा बोडस हिची वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे. येत्या शनिवारी १६ जुलै रोजी या नाटकाचा प्रयोग आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, पनवेल येथे होणार आहे त्यावेळी हृताची भूमिका मृगा बोडस साकारताना दिसणार आहे. त्यामुळे हृताने हे नाटक सोडले असल्याचे जाहीर झाले आहे. या गोष्टींमुळे हृताचे चाहते नक्कीच नाराज होणार आहेत.

मृगा बोडस ही नाट्य मालिका अभिनेत्री आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेत मृगा बोडस हिने महाराणी ताराराणीची भूमिका साकारली होती. सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत ती सक्रिय असलेली पाहायला मिळत आहे. हृता या नाटकाचा भाग नसणार त्यामुळे मृगा गेल्या काही दिवसांपासून आपल्या भूमिकेचा सराव करत होती. हृताने साकारलेली भूमिका तिच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक ठरणार असले तरी ती हे आव्हान आपल्या अभिनयाने सहज पेलू शकते असा विश्वास आहे. दरम्यान हृता एकेक करून मालिका आणि नाटकातून बाजूला होत असल्याने तिच्या चाहत्यांनी आता नाराजी दर्शवली आहे. याबाबत हृताचे काय म्हणणे आहे हे लवकरच समोर येईल. तूर्तास मृगा बोडस हिला दादा एक गुड न्यूज आहे या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा.