
जसा मालिकांमध्ये लग्न सोहळ्यांचा ट्रॅक येतो ना तसं सध्या अनेक कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात सुरू आहे. आता सेलिब्रिटी कलाकारांच्या लग्नाचा इव्हेंट जसा खास असतो, त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लाइक्स घेत असतात तसेच त्यांच्या हनिमून डायरीजही तुफान व्हायरल होत असतात. गेला आठवडा सोनाली कुलकर्णीने पहिल्या लग्नाचा दुसरा हनिमून मेक्सिकोला साजरा केला हे तिच्या चाहत्यांना सोशल मीडियानेच सांगितलं. आता टीव्हीस्टार हृता दुर्गुळेनंही हनिमूनसाठी एकदम हटके डेस्टीनेशन निवडलं आहे. हृता दुर्गुळे ही मुळातच सोशल मीडियावरची स्टार आहे. दोन मिलियन्स फॉलोअर्स असणारी पहिली मराठी अभिनेत्री हा टॅग तिला काही दिवसांपूर्वीच लागला आहे. सध्या मन उडू उडू झालं या मालिकेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये भरच पडली आहे. या मालिकेत इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊतसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.

या मालिकेसोबतच दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातून तिने नाट्यरसिकांचीही मनं जिंकली आहेत. हृता पुन्हा चर्चेत आली ती तिच्या लग्नामुळे. डिसेंबरमध्ये मो्ठ्या थाटात प्रतीक शाह याच्याशी साखरपुडा केला होता. तर मे महिन्यात ती प्रतीकशी लग्न करणार असल्याची बातमी आली होती. पण लग्नाचा कोणताच प्रीइव्हेंट न करता थेट हृता आणि प्रतीकच्या लग्नाचेच फोटो समोर आले. जेव्हा तिने प्रतीकविषयी चाहत्यांना उत्सुकतेने सांगितले तेव्हा तिला, मराठी मुलगा मिळाला नाही का असं म्हणत काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. म्हणूनच तिने लग्नाचा फार गाजावाजा केला नाही असंही कारण समोर आलं. हृता आणि प्रतीक यांचं १८ मे रोजी लग्न झालं आणि तिसऱ्याच दिवशी ही जोडी हनिमूनसाठी जात असल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. हृताने दोन दिवसांपूर्वी विमानतळावरचा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. लेटस गो प्रतीक असं म्हणत तिने प्रतीकलाही टॅग केलं होतं. तेव्हाच चाहत्यांना कळून चुकलं ही जोडी हनिमूनला जातेय. विमानातील व्हिडिओ बघून हृता आणि प्रतीक परदेशातील डेस्टिनेशवर गेल्याची चाहूल तर लागली. पण हृता आणि प्रतीकने हनिमूनसाठी कुठलं डेस्टिनेशन निवडलं हे तिने सांगितलं नव्हतं.

आता मात्र हृताने तिच्या चाहत्यांसाठी हनिमून डायरी खुली केली आहे. सध्या हृता आणि प्रतीक हे इस्तंबूल टर्की या देशात एन्जॉ्य करत असल्याचे फोटो तिने शेअर केले आहेत. हृता आणि प्रतीक टर्कीतील पर्यटन स्थळांना भेट देत असून तेथील खाद्यपदार्थावरही ताव मारत आहेत. हृता नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता तर ती हनिमूनसाठी गेली असून टर्कीमध्ये ती कसा एन्जॉय करतेय हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. त्यांच्यासाठीच तिने तिचे टर्कीतील फोटो शेअर केले आहेत. सध्या हृताने मन उडू उडू झालं या मालिकेतूनही सु्टी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील तिचे सीन कमी करण्यासाठी तिला अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. टर्कीमध्ये हृता प्रतीकसोबत हनिमून साजरा करत आहे तर मन उडू उडू झालं या मालिकेत ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना प्रेक्षकांना दिसणार आहे. सध्या तरी हृता लग्नानंतरच्या गुलाबी दिवसांमध्ये हरवून गेली आहे.