फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेली हृता दुर्गुळे प्रथमच चित्रपटातून मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हृता दुर्गुळे प्रतीक शाह सोबत विवाहबद्ध झाल्यानंतर एकापाठोपाठ येणाऱ्या दोन चित्रपटातून मुख्य नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. २८ जुलै रोजी तिचा टाईमपास ३ चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटात ती डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग खूप दिवस अगोदरच पूर्ण करण्यात आले होते मात्र यात अनेक अडथळे निर्माण झाले. रवी जाधव यांच्याच अनन्या या चित्रपटात हृता मुख्य भूमिका साकारत आहे. अनन्या या असाधारण मुलीची गोष्ट घेऊन हृता दुर्गुळे मोठया पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

येत्या २२ जुलै २०२२ रोजी अनन्या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये अनन्या देशमुखचा ऍक्सिडंट होतो आणि त्यात ती आपले दोन्ही हात गमावून बसते. शरीराचा अवयव गमावून बसल्यानंतर अनन्याचे वडिल निराशेच्या छायेत वावरताना दिसतात. मात्र या परिस्थिती पुढे कुठलीही हार न मानता ती मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने पुढे जात यश गाठताना दिसते. या चित्रपटात हृता दुर्गुळे सोबत अभिनेता चेतन चिटणीस स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चेतन चिटणीस हा मराठी तसेच बॉलिवूड चित्रपट अभिनेता आहे. मलाल या बॉलिवूड चित्रपटातून त्याने बबनची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे चेतनला चांगली प्रसिद्धी मिळाली. वजनदार, फोटोकॉपी, प्रेम हे, फो मो अशा चित्रपट आणि सिरीजमधून चेतन प्रेक्षकांच्या समोर आला आहे. फो मो ही सिरीज युट्युबच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्याला प्रेक्षकांकडुन खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता अनन्या चित्रपटातून चेतन मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. ‘न कळता’ हे चित्रपटातील पहिलं रोमँटिक गाणं उद्या प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हृता दुर्गुळे आणि चेतन चिटणीस यांच्यासोबत योगेश सोमण, सुव्रत जोशी, ऋचा आपटे, रेणुका दफ्तरदार, सुनील अभ्यंकर यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अनन्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर अनेकांनी छानशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट मोठे यश मिळणार अशी आशा रवी जाधव यांना आहे. हृता दुर्गुळे हिचा प्रदर्शित होत असलेला हा पहिलाच चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटाची तिला खूप उत्सुकता आहे. तर चेतन चिटणीस याला देखील मध्यवर्ती भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली आहे. अनन्याच्या संघर्षाच्या काळात सगळेच तिची साथ सोडताना दिसले मात्र तो शेवटपर्यंत अनन्याची साथ निभावणार का याची चित्रपटातून उत्सुकता निर्माण झाली आहे. हृता दुर्गुळे आणि चेतन चिटणीस यांना अनन्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा.