तुमच्या दिसण्यावरून तुमची भूमिका ठरते असे मनोरंजन विश्वात बोलले जाते. अर्थात मराठी सृष्टीत या गोष्टी गौण मानल्या जात असल्या तरी हिंदीत मात्र या गोष्टीला फार महत्व दिलं जातं. म्हणूनच जाड जुड दिसणारे कलाकार विनोदी भूमिकेसाठी योग्य ठरवले गेले. त्यातलीच एक म्हणजे अभिनेत्री “गुड्डी मारुती”. अभिनेते मारुती परब यांची ती मुलगी. तिचं खरं नाव ताहिरा परब, पण घरी तिला गुड्डी म्हणून हाक मारत आणि पुढे चित्रपटातही तिचे पदार्पण याच नावाने झाले. गुड्डीचे आईवडील दोघेही हिंदी चित्रपट कलाकार. मुंबईतील युनिक गार्डन येथे त्यांचा छानसा मारुती बंगला होता. पण वडीलांच्या निधनानंतर घरची आर्थिक परिस्थिती बदलली. डान्सच्या क्लासला १६ रुपये भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. गुड्डी मारुती वडिलांसोबत नेहमी चित्रपटाच्या सेटवर जायच्या. अंगाने धष्टपुष्ट असल्याने तिला बालकलाकार म्हणून काम मिळत गेले.
अर्थात बेढब शरीरामुळे त्यांना शाळेतून येता जाता मुलं जाडी म्हणून चिडवायचे. पण बिनधास्त गुड्डी ‘तुमच्या घरचं खाते का’ म्हणत या सर्वांना तिथल्या तिथे चोख उत्तर द्यायची. खरं तर तिला क्रिकेटचे वेड होते पण वडिलांच्या इच्छेखातर ती चित्रपटात काम करू लागली. ‘तुला हिरॉईनच्या भूमिका मिळणार नाहीत, तुला वेडेवाकडे हावभाव करूनच इथे काम मिळेल’ अशी समजूत वडिलांनी घातल्यानंतर गुड्डी असेल त्या भूमिका स्वीकारू लागली. १९८१ मध्ये वडिलांचे निधन त्यानंतर मात्र काम करणं भाग होतं. एका बहिणीचं लग्न झालं असलं तरी पाठची बहीण आणि भावाची तिच्यावर जबाबदारी होती. राहायला बंगला असला तरी हातात पैसे नसायचे. त्यामुळे इच्छा नसूनही नाईलाजाने चित्रपटात काम करावे लागले. आपण जाड असलो तरच आपल्याला ही कामं मिळतील, नाहीतर काहीच काम मिळणार नाही. कारण अशाच एका अभिनेत्रीने तिचं वजन कमी केलं तर तिच्या हातून कामं गेलेली त्यांनी पाहिली होती. त्यात १९९८ मध्ये भावाचं निधन झालं.त्यामुळे भरपूर खायचं आणि जाड राहण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता.
अगदी वयाच्या ३५ शी पर्यंत त्या कॉलेजची मैत्रीण म्हणून काम करत, त्यामुळे शेवटी या भूमिकांचा त्यांना कंटाळा येऊ लागला. पण जे मिळतंय ते काम करत राहायचं या विचाराने त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमधून काम केलं. २००६ मध्ये मात्र त्यांनी लग्नानंतर ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला. मूल हवं पण अनेकदा प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नव्हती. शेवटी आहे ते स्वीकारून पुन्हा इंडस्ट्रीत त्या दाखल झाल्या. पण इंडस्ट्रीत अनेक बदल त्यांना खटकले. आता वयोपरत्वे शूटिंगसाठी प्रवास करणे शक्य होत नाही. त्यामुळे जमेल तेवढंच काम त्या स्वीकारतात. गुड्डी परब यांनी मराठी चित्रपटातही काम केलं होतं. गुपचूप गुपचूप मध्ये त्या अशोक सराफ यांच्यासोबत झळकल्या होत्या.