
अभिनेत्री दिव्या पुगावकर ही गेले काही वर्षे मराठी मालिका सृष्टीत लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. कोकणातली ही कन्या नाटकामधून पुढे आली आणि मुलगी झाली हो मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. मुलगी झाली हो मध्ये दिव्याच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यानंतर दिव्याने मराठी मालिका सृष्टीत जणू ताबाच मिळवलेला पाहायला मिळाला. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेनंतर लगेचच तिला लक्ष्मी निवास मालिकेत मुख्य भूमिकेची संधी मिळाली. मुख्य नायिका म्हणून दिव्याची ही तिसरी मालिका आहे.

मालिका क्षेत्रात येण्यापूर्वीच दिव्या प्रेमात पडली होती. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अक्षय घरत सोबत तिची फेसबुकवर मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात आणि आता लग्नात रूपांतर होणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिव्याने तिच्या लग्नाची बातमी जाहीर केली होती. सेव्ह द डेट म्हणत तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले मात्र लग्नाची तारीख जाहीर करणे तिने टाळले होते. पण आता दिव्या लवकरच लग्नबांधनात अडकणार असल्याचे तिच्या केळवणावरून समोर आले आहे.

काल मंगळवारी दिव्याचं केळवण साजरं करण्यात आलं. मालिकेच्या कलाकारांनी अक्षय आणि दिव्याला केळवणाचं खास आमंत्रण दिलं होतं. यावेळी तुषार दळवी, हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर, हार्दिक जोशी, स्वाती देवल, निखिल राजेशिर्के, मीनाक्षी राठोड, महेश फलके, मेघन जाधव असे मालिकेचे सर्वच कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. अक्षया देवधरचा साड्यांचा ब्रँड भरजरी मधून दिव्याला गिफ्ट म्हणून साडी देण्यात आली. तर अक्षयलाही एक खास गिफ्ट देऊन त्याचा मानपान करण्यात आला.