मैने प्यार किया या पहिल्याच चित्रपटामुळे सुपरस्टारचा शिक्का मिळवलेली भाग्यश्री पटवर्धन ही मूळची सांगलीची. सांगलीच्या राजघराण्याची ती ज्येष्ठ कन्या होय. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन हे भाग्यश्रीचे वडील सांगली संस्थानात त्यांना मनाचे स्थान आहे तर रोहिणी पटवर्धन या भाग्यश्रीच्या आई. भाग्यश्री, मधूवंती आणि पूर्णिमा या त्यांच्या तीन कन्या. या तिन्ही मुलींचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले त्यामुळे बालपणापासून अभिनयाची आवड असलेल्या भाग्यश्रीने पुढे जाऊन बॉलिवूड चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. प्रमुख नायिका म्हणून साकारलेला तिचा मैने प्यार किया हा चित्रपट तुफान गाजला.

या चित्रपटाने भाग्यश्रीलाच नव्हे तर सलमान खानला देखील रातोरात स्टार बनवले होते. मात्र हिमालय दासानी सोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पुढे ती खूप कमी चित्रपटात झळकली. परंतु या मोजक्या चित्रपटातून तिला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाग्यश्री पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाली. थलाईवी, झक मारली बायको केली, देवा, रेड अलर्ट अशा तामिळ ,कन्नड, भोजपुरी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. भाग्यश्रीची धाकटी बहीण पूर्णिमा पटवर्धन ही देखील अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच ती उत्तम गायिका देखील आहे हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. पूर्णिमा पटवर्धन ही चाईल्ड आर्टिस्ट होती. १९८८ सालच्या शशी कपूर यांच्या हम तो चले परदेस या हिंदी चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. याच चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिने गाणे देखील गायले होते. कच्ची धूप या गाजलेलता मालिके मध्ये भाग्यश्री आणि पूर्णिमा पटवर्धन दोघीही बालकलाकार म्हणून एकत्रित झळकल्या होत्या. या दोघींवर चित्रित झालेले गाणे स्वतः पूर्णिमाने गायले आहे.

लहानपणापासूनच पूर्णिमाने चित्रपट, मालिकांसाठी गाणी गायली आहेत. पुढे कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगचे वेध तिला लागले. फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेमध्ये तिने उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता. काही ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करत असताना २००३ साली ‘ ताज महल अ मूव्हमेंट ऑफ लव्ह’ या चित्रपटात तिने मुमताज महलची प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता रघु राज सोबत स्क्रीन शेअर केली होती. बालकलाकार म्हणून आणि बालगायिका म्हणून नावारूपाला आलेली पूर्णिमा कालांतराने या क्षेत्रापासून दुरावली असली तरी आजही ती आपली गाणं गाण्याची हौस पूर्ण करताना दिसते. स्वतःच्या युट्युब चॅनलवर पूर्णिमा गाणी गात असते. पूर्णिमा प्रमाणे भाग्यश्रीने देखील स्वतःचा युट्युब चॅनल सुरू केला आहे. फिटनेस टिप्स आणि वेगवेगळे पदार्थ बनवून ती हे व्हिडीओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. या व्हिडिओजना तिच्या चाहत्यांकडून नेहमीच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो .आज भाग्यश्रीच्या वडिलांचा आणि धाकटी बहीण पूर्णिमाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाग्यश्रीने या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.