स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील रानुआक्का म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे यांना आज पितृशोक झाला आहे. आज अश्विनी महांगडे यांचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे ५६ व्या वर्षी को”रो” ना”ने निधन झाले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या ठिकाणी त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना भोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असतानाच आज त्यांचे दुःखद निधन झाले असल्याचे सांगितले जात आहे.

अश्विनी महांगडे या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर नाव लौकिक करताना दिसत आहेत खरं तर समाजसेवेचा हा वसा त्यांनी त्यांच्या वडिलांकडूनच घेतला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण अश्विनी महांगडे यांचे वडील प्रदीपकुमार महांगडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि पश्चिम भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात. भैरवनाथ देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, भैरवनाथ स्कुल कमिटीचे सदस्य अशा विविध संस्थांची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर पेलली होती. सामाजिक बांधिलकी सोबतच त्यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांतूनही अभिनय साकारला होता. त्यामुळे कलेची जाण त्यांना सुरुवातीपासूनच होती शिवाय काही नाटकांचे दिग्दर्शन देखील त्यांनी केलेले होते. अंगभूत असलेल्या कलागुणांमुळे त्यांच्या अभिनयाचा वारसा आता त्यांची लेक अश्विनी महांगडे नेटाने पेलताना दिसतात.

अशातच सामाजिक बांधिलकीची उपजत जाण असलेल्या अश्विनी गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या उपक्रमाअंतर्गत लोकांना मदत करत आहेत. रक्तदान शिबिर असो वा महा’ मारी संकटातील रुग्णांसाठी बेड मिळवून देणे असो या सर्वच कार्यात त्या नेहमी तत्पर असत. अशा कार्यात रात्री अपरात्री लोकांनी मागितलेल्या मदतीचाही त्यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. काही कारणास्तव मदत करता आली नाही तर वेळप्रसंगी त्यांनी हताश होऊन लोकांची माफी देखील मागितली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोफत जेवणाची सोय देखील उपलब्ध करून दिली होती. राजकारण, सामाजिक कार्य असो वा सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात प्रदीप कुमार महांगडे यांचा नेहमीच उत्स्फूर्तपणे सहभाग असायचा. गेल्या काही दिवसांपासून त्यांना भोर, पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु आज अखेर सर्वांचे लाडके प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण परिसरात आणि आसपासच्या गावामध्ये शोककळा पसरली आहे.