रात्रीस खेळ चाले २ या झी मराठीवरील मालिकेमुळे अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या झोतात आली. शेवंताच्या भूमिकेने अपूर्वाला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून ती पुन्हा शेवंताची भूमिका साकारताना दिसली. मात्र नवख्या कलाकारांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक आणि जाडेपणावरून तिला मालिकेच्या सेटवर टोमणे मारण्यात येऊ लागले. शिवाय ती साकारत असलेल्या भूमिकेला पुरेसा वाव मिळत नसल्याने तिने ही मालिका अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला होता. ज्या भूमिकेने आपल्याला ओळख दिली ती शेवंताची भूमिका सोडणे तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते मात्र मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने हा निर्णय घेण्याचे धाडस केले. यानंतर अपूर्वा स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत झळकली.

काही दिवसांपूर्वी अपूर्वा तिच्या आईसोबत दुबईची ट्रिप एन्जॉय करताना दिसली होती. आपल्या फिटनेसकडेही ती बारकाईने लक्ष्य केंद्रित करत आहे. तिच्या चाहत्यांनी तिला आगामी प्रोजेक्टबद्दल विचारले त्यावेळी मराठी बिग बॉसमध्ये जाणार का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची संभाव्य यादी सोशल मीडियावर अनेकांनी जाहीर केली आहे. या संभाव्य यादीत अपूर्वाचे देखील नाव घेतले जाते. याचमुळे तिच्या चाहत्याने तिला हा प्रश्न विचारला आहे. चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर अपूर्वाने दिलखुलासपणाने दिलेलं पाहायला मिळतं आहे. मराठी बिग बॉसचा चौथा सिजन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होईल असे बोलले जात आहे. या शोमध्ये येण्यासाठी कलाकारांना आमंत्रित केले जाते. मात्र बऱ्याचदा या शोमधून वेगळी इमेज प्रेक्षकांच्या समोर येत असल्याने यात सहभागी होण्यास कलाकार नकार देतात. अपूर्वाने देखील या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. याचे उत्तर देताना अपूर्वा म्हणते की, ‘नक्की नाही. मी एक अभिनेत्री आहे. मला फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत’. असे स्पष्टीकरणच तिने या उत्तरातून दिलेले असल्याने अपूर्वा नेमळेकर या शोमध्ये येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिग बॉसचा शो बऱ्याचदा वादग्रस्त ठरला आहे. मराठी बिग बॉसमध्येही असे अनेक वाद घडलेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे १०० दिवस एकाच घरात आणि तेही कॅमेऱ्यासमोर राहिल्याने सहभागी स्पर्धकांची एक वेगळी इमेज प्रेक्षकांच्या मनात तयार होत असते. त्यामुळे या शोपासून बरेच नामवंत सेलिब्रिटी दूर राहिले आहेत. हिंदी मालिका सृष्टीतील आघाडीच्या नायिका म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी तसेच जेनिफर विंगेट यांनाही बिग बॉसच्या येणाऱ्या १६ व्या सिजनसाठी आमंत्रित केले होते. मात्र या दोघींनीही आयोजकांना स्पष्ट नकार दिला आहे. या शिवाय अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिचे साड्यांचे दुकान देखील आहे. व्यवसायिकेला १०० दिवस कोणाशीही संपर्कात न राहता बिगबॉसच्या घरात बसने परवडणार नाही ह्याचा तिच्या व्यवसायावर मोठा परिणाम देखील होऊ शकतो. हे सर्व पाहता तिने ह्या बिग बॉसच्या शो मध्ये न जाणेच पसंत केले.