आज १५ ऑगस्ट २०२२ पासून झी मराठी वाहिनीवर नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत दीपा परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर दीपा परब हिचे मराठी मालिका सृष्टीत पुनःपदार्पण झालेले पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मालिकेत धनश्री काडगावकर पुन्हा एकदा काहीशा विरोधी भूमिकेत दिसणार आहे. आदित्य वैद्य, देवेंद्र दोडके, वैष्णवी कल्याणकर, बालकलाकार पिहू गोसावी असेही कलाकार मालिकेला लाभलेले आहेत. महत्वाचं म्हणजे मालिकेच्या पहिल्या प्रोमोमधून अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल या सासूबाईंच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

मात्र आता त्या या मालिकेचा भाग नसणार हे स्पष्ट झाले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत अन्नपूर्णा विठ्ठल यांच्याऐवजी ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर दिसणार आहेत. अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या मालिकेअगोदरही एक मराठी मालिका तडकाफडकी सोडली होती. अर्थात त्यांचे मालिका सोडण्याचे कारण समोर आले तेव्हा अनेकांनी अन्नपूर्णा विठ्ठल यांची बाजू मांडली होती. स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत त्या सुनील बर्वेच्या आईची भूमिका साकारत होत्या. मात्र सेटवर दिलेली अपमानास्पद वागणूक आणि एकाकीपणा त्यांना सतावत होता. मालिकेच्या सहकलाकारांनी देखील आपला मानसिक छळ केल्याचा त्यांनी आरोप लावला होता. या कारणास्तव त्यांनी मालिका सोडली होती. तू चाल पुढं या मालिकेमुळे त्यानी पुन्हा मराठी सृष्टीत पाऊल टाकलं अशी चर्चा रंगली. मात्र प्रोमोमध्ये झळकलेल्या अन्नपूर्णा विठ्ठल यांनी आता ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. या मालिकेऐवजी त्या ‘अलीबाबा दस्तानए कबूल’ या सोनी सब वाहिनीवरील मालिकेत झळकणार आहेत.

त्या साकारत असलेल्या या हिंदी मालिकेचे शूटिंग नुकतेच शिरू झाले असून त्या मराठी मालिका करणार नसल्याचे दिसून येते. अन्नपूर्णा विठ्ठल यांची भूमिका आता प्रतिभा गोरेगावकर साकारणार आहेत. प्रतिभा गोरेगावकर यांनी अग्गबाई सासूबाई या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. काही हिंदी भाषिक मालिकामधूनही त्या झळकल्या आहेत. अग्गबाई सासूबाई नंतर त्या साथ निभाना साथीया या हिंदी मालिकेत दिसल्या होत्या. तू चाल पुढं या मालिकेत त्या अश्विनीची सासू म्हणजेच उज्वला वाघमारे ची भूमिका निभावताना दिसणार आहेत. झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं या नव्या मालिकेसाठी मराठी अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा….