२९ एप्रिल २०२२ रोजी ‘चंद्रमुखी ‘ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील चंद्रा हे पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने अजय अतुल यांच्या संगीताची जादू आणि अमृताच्या नत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकुन घेतली आहेत. त्यामुळे चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अमृता खानविलकर चंद्राच्या भूमिकेत दिसणार असल्याने तिच्या सहजसुंदर अभिनयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमृताची खास मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अमृताचे कौतुक करताना सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

यात अभिनेत्री अंकिता लोखंडे म्हणते की, ‘ अम्मू मला लोकांना आपल्याबद्दल खूप काही सांगायचं आहे मात्र आजचा दिवस फक्त तुझा आहे. आज मला या संधीचा फायदा घेत लोकांना सांगायचे आहे की तू माझ्यासाठी स्टार किंवा सेलिब्रिटी नाहीस तर तू एक सच्चा कलाकार आहेस…. तू माझ्यासाठी कलाकार आहे. एक असा कलाकार जो आपल्या अभिनयाच्या जोरावर आम्हाला हसवू आणि रडवू शकतो….मला आठवतंय जेव्हा आपण झी सिने स्टार की खोज मध्ये होतो तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात नेहमी स्पर्धा असायची की कोण चांगलं नाचतं .पण तुला तर माहीतच होतं की मी सर्वोत्कृष्ट डान्सर होते, नाही का अम्मू?…हा झाला विनोदाचा भाग पण जेव्हा तुझ्या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं तेव्हा ते पाहून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तुला तिथं पाहणं माझ्यासाठी स्वप्नवत होतं आणि ज्याप्रकारे ते लॉन्च झालं ते खूपच उत्कंठा वाढवणारं होतं….wowww…. माझ्यासाठी ती अमृता नव्हती तर ती चंद्रमुखी होती. मला तुझा खूप अभिमान वाटतो, तुझा हा प्रवास खूपच आश्चर्यकारक आहे. तू एक चांगली मुलगी आहेस, चांगली बहीण आहेस , चांगली पत्नी, खूप चांगली मैत्रीण आणि विलक्षण अभिनेत्री आहेस.

अपार मेहनत घेऊन तू या इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहेस तू खूप चांगल्या लोकांसोबत काम केलं आहेस ज्याला तुझ्यातील कौशल्यावर विश्वास आहे. तू या यशाची हक्कदार आहेस आणि अजूनही तूला खूप पुढे जायचं आहे. तुझं गाणं लॉंच झालं त्यावर मी तुझ्यासोबत लवकरच डान्स करणार आहे. तुला मोठ्या पडद्यावर भेटण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.’ अमृताच्या चंद्राच्या भूमिके बाबत अंकिताने ही कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे यासोबतच आपली मैत्री २००४ पासूनची आहे आणि ती मरेपर्यंत अशीच अबाधित राहणार आहे याचीही तिने आठवण करून दिली आहे.