तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार हिचं थाटात लग्न झालं. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण लग्न लागताच भर मांडवात अमृताने तिच्या नवऱ्याला असा एक प्रश्न की त्याचं काय उत्तर दयावं हे त्याला कळेनाच. नवी नवरी अमृताचा हा प्रश्न ऐकून वऱ्हाडी मंडळींनीही तिचं कौतुक केलं. काय होता हा प्रश्न? अभिनयक्षेत्रातील अमृता आणि इंजिनीअर असलेल्या नील पाटील यांचं नुकतच लग्नं झालं. ४ एप्रिल रोजी या दोघांचा साखरपुडा झाला होता. तर गेल्या आठवड्यापासूनच दोघांच्या लग्नाची धामधूम सुरू होती. अमृताने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी साजरी करत लग्नाची हिंट दिल्याने अमृताच्या चाहत्यांनाही तिच्या लग्नाचे वेध लागले होते.

२ जुलै रोजी अमृताच्या लग्नविधींना सुरूवात झाली आणि ६ जुलै रोजी अमृता-नील विवाहबंधनात अडकले. सध्या कलाकारांच्या लग्नाचा बार उडत आहे. गेल्या काही दिवसात मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात जोडीदार निवडला आहे. मेंदी, हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत कलाकार त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधण्यातही आघाडीवर आहेत. आपलं लग्न डिजिटल स्वरूपात अनुभवण्याची संधी कलाकारही चाहत्यांना देत आहेत. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदितीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अमृता पवार हिनेही तिच्या लग्नातील खास क्षण चाहत्यांशी शेअर केले आहेत. अमृताच्या लग्नाच्या फोटोंबरोबरच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अभिनेता संग्राम समेळ याने त्याच्या इन्स्टा पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अमृता नवरा नीलला असं विचारत आहे की ठेवशील ना मला सुखात? लग्न लागताच भर मांडवात अमृताच्या या प्रश्नावर नीलला काय बोलायचे हे सुचेनासं झालंय तर वऱ्हाडी मंडळी मात्र वा वा म्हणत अमृताचं कौतुक करत आहे. आता असा प्रश्न अमृताने का विचारला असं तिच्या चाहत्यांना वाटू शकतं, पण हा प्रश्न म्हणजे अमृताने घेतलेला भन्नाट उखाणा आहे.

अमृता उखाण्यात असं म्हणाली, पाटलांच्या घरात प्रवेश करून करणार नवीन संसाराची सुरूवात नीलरावांचं नाव घेते, ठेवाल ना मला सुखात? अमृताचा हा उखाणा सोशलमीडियावर चांगलीच पसंती मिळवत आहे. अमृता सध्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत आदिती देशमुख ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत तिची आणि हार्दिक जोशीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब यातील मुलामुलींचं लग्न होतं तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल होतात यावर ही मालिका बेतली आहे. या मालिकेतही अमृता आणि हार्दिकचा लग्नाचा ट्रॅक होता. आता मात्र अमृता तिच्या खऱ्या आयुष्यात नीलशी लग्न करून तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असा गोड प्रश्न विचारत आहे.