
कधी होणार कधी होणार असं म्हणत असतानाच बॉलीवुड मधलं हॉट कपल म्हणून ओळखली जाणारी रणबीर कपूर आणि आलिया भट ही जोडी आज 14 एप्रिल ला दुपारी दोन वाजता रणबीरच्या वास्तू या घरातच लग्नगाठ बांधणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या तारखेबाबत वेगवेगळी चर्चा होत होती पण शेवटी रणबीरच्या आई अभिनेत्री नीतू सिंग आणि बहिण रिद्धिमा कपूर यांनी 14 तारखेला या दोघांचं लग्न अत्यंत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगितलं . अर्थातच लवकरच रणबीर आणि आलिया त्यांच्या मित्रपरिवाराला जंगी पार्टी देणार आहेत. 13 एप्रिल पासून आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाचे विधी सुरू होणार होते. त्याप्रमाणे 13 तारखेला आलियाचा मेहंदी सोहळा झाला . आलियाच्या मेहंदी सोहळ्यासाठी 13 एप्रिल हीच तारीख निवडण्याचं एक खास कारण म्हणजे 43 वर्षापूर्वी 13 एप्रिल याच दिवशी रणबीरचे आई वडील म्हणजेच ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा साखरपुडा आर. के. हाऊस मध्ये झाला होता.

कृष्णा राज कपूर यांच्या नावाने कृष्णाराज बंगला म्हणूनही ही वास्तू ओळखली जाते . आपल्या आजीच्या आठवणी जपण्यासाठी रणबीर आणि आलिया यांचं लग्न कृष्णाराज बंगल्यातच करायचं असं ठरलं होतं . परंतु शेवटच्या क्षणी लग्नाचं डेस्टिनेशन बदलण्यात आलं आणि आता हे लग्न रणबीरच्या वास्तू या आलिशान फ्लॅटमध्ये होणार आहे. आलिया भट ची आई सोनी राजदानचे वडील सध्या तब्येतीच्या कारणामुळे आजारी आहेत आणि त्यांची अशी इच्छा होती ती लवकरात लवकर आलिया आणि रणबीर यांचं लग्न व्हावं. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आलिया आणि रणबीर हे तातडीने बोहल्यावर चढत आहेत. कारण काहीही असो , पण गेल्या पाच वर्षापासून या जोडीचे शुभमंगल कधी होणार याची या दोघांचेही चाहते खूप आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे रणबीर आणि आलिया यांच्या चाहत्यांसाठी देखील ही एक ट्रीट आहे. रणबीर आणि आलिया यांचं लग्न हे त्यांच्या गेल्या पाच वर्षाच्या डेटिंग मुळे तर गाजलं होतच परंतु लग्नाचे विधी सुरू होईपर्यंत रणवीर चे काका रणधीर कपूर आणि आलियाचे काका मुकेश भट यांना निमंत्रण पोहोचलं नसल्याचीही चर्चा होती. रणधीर कपूर यांना निमंत्रण न देण्याचे कारण हे फक्त नीतू सिंग यांनाच माहीत होतं परंतु त्यांनी याबाबत मौन पाळले होतं. तर भट कुटुंबातील काही रुसवा फुगव्यांमुळे आलियाचे काका मुकेश भट यांना लग्नाचे निमंत्रण पोहोचलं नव्हतं. आता उद्या नवरा-नवरीचे काका या लग्नात दिसतात की नाही यावरूनच हे रुसवे-फुगवे मिटलेत हे कळू शकेल.

ब्रेन विथ ब्युटी अशी ओळख असलेली आलिया भट तिच्या लग्नात सब्यासाची ने डिझाईन केलेला लेहंगा घालणार आहे. तर मेहंदीच्या सोहळ्यासाठी मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला पेहराव आलियाने घातला होता. तर बॉलिवुडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर हा पारंपारिक शेरवानी मध्ये उद्या पाहायला मिळणार आहे. या दोघांच्याही लग्नानिमित्त आर के हाऊस बरोबरच रणबीरचे वास्तु हे निवासस्थान आणि आलियाचा जुहू होतील फ्लॅट यांचीही खास सजावट करण्यात आली आहे. ब्रह्मस्त्र या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रणबीर आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले. या चित्रपटाचं शूटिंग लॉकडाऊन मध्ये थांबवण्यात आलं परंतु नंतर पुन्हा एकदा हे शूटिंग सुरू झालं. खरेतर ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यानंतरच लग्न करायचं असे या दोघांनी ठरवलं होतं पण काही कारणाने का असेना या दोघांची लग्न घटिका अगदी काही तासांवर येऊन ठेपली आहे. ज्या ब्रम्हास्त्र या सिनेमाने दोघांना एकत्र आणलं तो सिनेमा येत्या सप्टेंबर मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्री पाहण्यासाठीही त्यांचे चाहते उत्सुक आहेत. पण सध्या मात्र चर्चा आहे ती रणबीर आणि आलिया या हॉट जोडीच्या हॉट लग्नाची.