स्त्रियांचं साडीवर जरा जास्तच प्रेम असतं. कॉलेजमध्ये असताना मामाने घेतलेली, लग्नात आईने घेतलेली, लग्नानंतर आजीने तिच्या लग्नातली भेट म्हणून दिलेली, लग्नानंतरच्या पहिल्या सणाला सासूने आणलेली, लग्नं ठरल्यानंतर नवऱ्याकडून पहिल्यांदा गिफ्ट मिळालेली, नोकरी लागल्यानंतर मुलाने खास आणलेली अशा एक ना अनेक आठवणींचे धागे मुलींच्या साडीप्रेमासोबत विणलेले असतात. आई, आजी, मावशी, आत्या यांच्याकडून मिळालेली साडी तर जुनी जरी असली तरी ती नेसून मिरवण्यात वेगळाच आनंद असतो. हा आनंद सर्वसामान्य महिलाच नव्हे तर अगदी लाखो रूपये कमवणाऱ्या सेलिब्रिटी नायिकांनाही हवाहवासा वाटतो. सध्या अशाच आनंदात रमली आहे अभिनेत्री अक्षया देवधर.

अक्षयाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. यामध्ये ती चॉकलेटी रंगाच्या शालूमध्ये नटली आहे. केसांत गजरा, नाकात नथ आणि जोडीला ती खास साडी हा तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यापूर्वीही अक्षयाने अनेकदा साडीतील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, पण या फोटोसोबत तिने लिहिलेली कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. म्हणूनच ही साडी वेगळी आहे. अक्षयाने असं लिहिलं आहे की ४० वर्षापूर्वीची ही साडी आहे आणि एका खास व्यक्तीने मला भेट दिली आहे. आता अक्षयाला ४० वर्षापूर्वीची रेशमी साडी नेमकी कुणी भेट दिली आणि ती भेट देणारी व्यक्ती तिच्यासाठी खास का आहे या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय तिचे चाहते काही शांत बसणार नाहीत. अक्षयाने ही ४० वर्षापूर्वीची साडी नेसून तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली. या लग्नातलेच फोटो आणि व्हिडिओ अक्षयाने शेअर केले आहेत. अक्षया नेहमीच साडीतील छान छान फोटो शेअर करत असते. तसेच तिचा मॉडर्न लुकही तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. पण यावेळी तिच्या अंगावरील साडी ही आजच्या काळातील नसून ४० वर्षापूर्वीची आहे. चॉकलेटी रंगाच्या या जरीकाठाच्या शालूचा रेशमी पोत अगदी अस्सल आहे.

अक्षयाच्या बहिणीच्या सासूबाईंच्या लग्नातला हा शालू आहे जो त्यांनी अक्षयाला भेट म्ह्णून दिला आहे. बहिणीच्या सासूबाईंनी दिलेला जुन्या काळातील शालू नेसून अक्षया जेव्हा तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तेव्हा त्या शालूचं खूपच कौतुक झालं. विशेष म्हणजे अक्षयाच्या कलेक्शनमध्ये एकाहून एक महागड्या आणि फॅन्सी साड्या असताना तिने बहिणीच्या सासूबाईंनी दिलेली ४० वर्षापूर्वीची रेशमी साडी नेसण्याचं ठरवलं. तिचे ते फोटो बघून बहिणीच्या सासूबाईंनाही खूप आनंद झाला असणार हे नक्की. अक्षया सध्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अंजली पाठक या भूमिकेमुळे ती लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वी याच मालिकेतील तिचा नायक राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी याच्याशी तिचा साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंनाही खूप पसंती मिळाली. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. गेल्या आठवडयात अक्षयाचा वाढदिवसही हार्दिकने साजरा केला. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.