कधी होणार कधी होणार असं म्हणत मुहूर्ताकडे डोळे लावून बसलेल्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या चाहत्यांसाठी आता ही जोडी गोड बातमी घेऊन आली आहे . आली लग्नघटिका समीप असं म्हणत अभिनेत्री अक्षया देवधरने मुंडावळ्या बांधलेला फोटो तिच्या सोशल मीडियावर नुकताच शेअर केलाय. येत्या २ डिसेंबरला हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे एकमेकांशी लग्नगाठ बांधणार आहेत . पुण्यात हा लग्न सोहळा होणार आहे. हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाला आता अवघे चार दिवस उरले असून लग्नापूर्वीच्या विधीना देखील सुरुवात झाली आहे. अक्षयाच्या पुण्यातल्या घरी ग्रहमख विधींना सुरुवात झाली असून हार्दिकच्या घरी त्याला घरचं केळवण करण्यात आलं. दोघांनीही आता लग्नाच्या तयारीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला सुरुवात केली आहे. झी मराठीच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा ही भूमिका साकारणारा हार्दिक जोशी आणि याच मालिकेत अंजली पाठक बाई या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर यांनी त्यांच्या चाहत्यांना खरंतर एक सुखद धक्काच दिला होता.

आम्ही छान मित्र आहोत असं म्हणता म्हणता दोघं कधी प्रेमात पडले याचा चाहत्यांना पत्ताही लागू दिला नाही. खरंतर हार्दिक च्या आईनेच त्याने अक्षयाला प्रपोज करावं असं सुचवलं होतं.पण सुरुवातीला हार्दिक असं काहीच करायला तयार नव्हता. तो आईला नेहमी सांगायचा की अक्षया ही माझी फक्त चांगली मैत्रीण आहे आणि मी तिला असं काहीच विचारू शकत नाही. पण आईने त्याला सांगितलं की बघ विचारून ती नक्की हो म्हणेल आणि मग हार्दिकने त्याच्या मनातल्या भावना अक्षयाला बोलून दाखवल्या आणि अक्षयानेही होकार दिला. यावर्षीच्या अक्षय तृतीयेला दोघांनी साखरपुडा करत तुझ्यात जीव रंगला हे केवळ मालिकेतच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही म्हटलं. अर्थातच दोघांच्या या नात्याचं त्यांच्या चाहत्यांनीही खूप स्वागत केलं. गेल्या सात महिन्यांपासून अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आता साखरपुडा झाला, लग्नाचा मूहूर्त कधी असे चाहते त्यांच्या सोशल मीडियावर कमेंट करून विचारत होते. काही महिन्यांपूर्वीच अक्षया आणि हार्दिक एका सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडन दौऱ्यावर गेले होते त्यावेळेसही अनेक फोटो दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले. तसेच साखरपुडा झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे वाढदिवस देखील खास शुभेच्छा देऊन साजरे केले. साखरपुडा ते लग्न या काळातला प्रत्येक क्षण ही दोघं मस्त जगत होती आणि प्रत्येक क्षण चाहत्यांबरोबर शेअरही करत होती. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी अक्षया हार्दिक च्या घरच्या गणेशोत्सवाला देखील उपस्थित राहिली होती तसेच हार्दिकच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमातही अक्षयचा सहभाग आवर्जून असायचा. अक्षया ही नेहमी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते त्यामुळे हार्दिक सोबतचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते.

ता दोन डिसेंबर हा हार्दिक आणि अक्षया च्या लग्नाचा मुहूर्त ठरला असून जोशी आणि देवधर यांच्या घरात आता सनई चौघडे वाजू लागले आहेत. अक्षयाने तिच्या स्टोरीमध्ये मुंडावळ्या बांधून नवरीच्या साजात सजलेला फोटो तिच्या स्टोरीमध्ये शेअर केला आहे. तिने हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रिपोस्ट केला आहे. लगीन घाईदरम्यान अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. तर दुसरीकडे हार्दिक जोशीने त्याच्या घरी झालेल्या केळवणाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये हार्दिक खुश दिसत आहे. ‘घरचं केळवण’ अशी कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे. घरचं केळवण म्हटलं की पंचपक्वान्न आलेच . त्याच्यापुढे ठेवण्यात पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे, ताटाभोवती रांगोळी काढण्यात आली आहे तर फुलांची रांगोळीही आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये हार्दिक हा विधी एन्जॉय करताना दिसतोय.गेल्या काही दिवसांपासून हार्दिक-अक्षयाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे, मात्र त्यांच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा होत नव्हता. आता हार्दिकच्या पोस्ट केलेल्या एका स्टोरीवरुन त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली. हार्दिकच्या एका मैत्रिणीनेही त्याच्या केळवणाचा फोटो शेअर केला होता, तोच हार्दिकनेही रिपोस्ट केला. दरम्याना या फोटोमध्ये तिने #6daystogo असा हॅशटॅग वापरला. २६ नोव्हेंबर रोजी ही पोस्ट करण्यात आली होती. २ डिसेंबरला ही जोडी पुण्यात लग्नगाठ बांधणार आहे .