
लवकरच लग्नबंधनात अडकणारी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही जोडी सध्या लंडनमध्ये पर्यटनाचा आनंद घेत आहे. अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर या जोडीने साखरपुडा करून चाहत्यांना गोड बातमी दिली होती. अजून त्यांनी लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. पण एकत्रितपणे फिरण्याचा आनंद घेत त्यांचे लग्नाआधीचे गुलाबी दिवस मजेत सुरू आहेत. गेल्या काही दिवसात मराठी कलाकारांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. मालिकेत एकमेकांचे सहकलाकार म्हणून भेटलेल्या कलाकारांमध्ये प्रेमाचा धागा गुंफतो आणि मग ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार होतात. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा आणि पाठकबाई या भूमिकांमुळे लोकप्रिय झालेले हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता लवकरच लग्न करणार आहे.

गेले काही दिवस ते एकमेकांना भरपूर वेळ देत असल्याचं दिसत आहे. सध्या ही जोडी लंडनमध्ये पर्यटनाचा आनंद लुटत आहे. अक्षयाने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. तुझ्यात जीव रंगला ही मालिका छोट्या पडद्यावर खूप गाजली. या मालिकेत रणविजय गायकवाड म्हणजेच पैलवान राणादाच्या भूमिकेत हार्दिक जोशी होता तर अंजली पाठक ही भूमिका अक्षया देवधरने वठवली. मालिकेत तर ही जोडी हिट झालीच पण आता ते प्रेमातही पडले आहेत. या मालिकेच्या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली असल्याचं दोघांनी सांगितलं. मालिका संपल्यानंतरही त्यांची मैत्री कायम होती, त्यातूनच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
३ मे रोजी अक्षयतृतीयाचा मुहूर्त साधून अक्षया आणि हार्दिक यांनी कोल्हापुरात साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याची बातमी त्यांनी इतकी अचानक सांगितली की चाहतेही दंग झाले. हार्दिक आणि अक्षयाच्या साखरपुडयाचे फोटो खूपच व्हायरल झाले होते. सध्या या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. गेल्या महिन्यातच या जोडीने पुण्यातील एक स्थळ लग्नासाठी निश्चित केलं आहे, मात्र अजून् त्यांच्या लग्नाची तारीख काही त्यांनी सांगितली नाही. दोघांच्याही चाहत्यांना या जोडीच्या लग्नाचे वेध लागले आहेत. लग्न होण्याआधी हार्दिक आणि अक्षया एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

काही दिवसांपूर्वी ही जोडी कोकणात फिरायला गेली होती, तसेच त्यांनी पावसातही भटकंतीचा आनंद लुटला, अक्षयाचा वाढदिवसही हार्दिकने तिला सरप्राइज देत साजरा केला. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अक्षयाने हार्दिकसाठी घेतलेला उखाणाही खूप व्हायरल झाला होता. आता हार्दिक आणि अक्षयाचे लंडनमधले फोटो सोशलमीडियावर आले आहेत. हार्दिकने त्याच्या इन्स्टास्टोरीतून ही माहिती दिली आहे तर सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असलेल्या अक्षयानेही इन्स्टापेजवर हे फोटो शेअर केले आहेत. या ट्रीपमध्ये ही जोडी मस्त एन्जॉ्य करताना चाहत्यांना पहायला मिळत आहे. लंडनहून आल्यानंतरच आता त्यांच्या लग्नाची तारीख ठरेल. सध्या तरी अक्षया आणि हार्दिकची लंडनवारी जोरात सुरू आहे. सध्या हार्दिक , तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिध्दार्थ देशमुख ही भूमिका साकारत आहे. खऱ्या आयुष्यात हार्दिक अक्षयासोबत लंडनला गेल्यामुळे मालिकेतही तो काही भागात दिसणार नाही. त्यासाठी मालिकेतही सिध्दार्थ अमेरिकेला गेल्याचा ट्रॅक सध्या दिसतोय. अक्षयाने काही दिवसांपूर्वी हे तर काहीच नाय या शोचं निवेदन केलं होतं.