झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली ३६ गुणी जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अल्पावधीतच या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. वेदांत आणि अमूल्या यांचे उडणारे खटके आणि छोट्या छोट्या गोष्टीतून होणारी भांडणं हळू हळू प्रेक्षकांची पसंती मिळवू लागली आहे. मालिकेतला कलाकारांचा सहज वावर आणि उत्तम अभिनय ही मालिकेची जमेची बाजू ठरली आहे. लवकरच अमूल्याचा भाऊ सार्थक आणि वेदांतची बहीण आद्या यांचे लग्न होत आहे. या दोघांमुळे अमूल्या आणि वेदांत यांची भेट घडून येते. अनुष्का सरकटे, आयुष संजीव हे मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत तर तेजस डोंगरे, सुरभी भावे, अविनाश नारकर, अभिजित चव्हाण, ऋजुता देशमुख, अक्षता आपटे, सागर कोरडे यांनी या मालिकेला चांगली साथ दिली आहे.

मालिकेत वेदांतच्या बहिणीची म्हणजेच आद्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री अक्षता आपटे हिने. अक्षताने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. अक्षता आपटे ही थिएटर आर्टिस्ट आहे. कॉलेजमध्ये असताना ती रंगभूमीशी जोडली गेली. कलादिंडी या नाटकातून तिने मुख्य भूमिका साकारली होती. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ४ जानेवारी २०२३ रोजी अक्षताचा साखरपुडा झाला होता. तिचा होणारा नवरा हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. होय अक्षताने स्वानंद केतकर सोबत साखरपुडा केलेला आहे. या दोघांची गेल्या अनेक वर्षांपासून चांगली ओळख होती. रुईया कॉलेजमध्ये हे दोघेही एकत्रित अभिनयाचे शिक्षण घेत होते. स्वानंद केतकर याने तू तेव्हा तशी या मालिकेत नीलची भूमिका गाजवली आहे. या मालिकेमुळे स्वानंद प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. राधा आणि निलचे लग्न व्हावे म्हणून आता मालिकेत प्रयत्न सुरु आहेत. स्वानंदला या भूमिकेने ओळख मिळवून दिली आहे. अक्षता आणि स्वानंद या दोघांची मैत्री आता लवकरच नात्याच्या बंधनात अडकणार आहे. या दोघांनी कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कलाश्रय या संस्थेची स्थापना केली.

यातून वारली आर्ट वर्कशॉप, म्युजिक वर्कशॉप, गायन स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्वानंदने या मालिकेअगोदर छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. तर अक्षताची ३६ गुणी जोडी ही पहिलीच मालिका आहे .यात ती नायकाच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे अक्षताला प्रथमच छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. पण तिचा अभिनय पाहता अभिनयाची चांगली जाण तिला असल्याचं दिसून येत. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते. आता होणार पती देखील झी मराठीवरीलच मालिकेत असल्याने दोघांच्या भेटीगाठी देखील नक्कीच वाढतील. असो ३६ गुणी जोडी मालिकेतील नव्या भूमिकेसाठी अक्षता आपटे हिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.