
मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा पती मेहुल पै याला कॅन्सरचे निदान झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अभिज्ञाने हॉस्पिटलमध्ये असलेला मेहुल सोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर मेहुलने स्वतः कॅन्सरशी झुंज देत असल्याचे सोशल मीडियावर जाहिर केले होते. मेहुल आणि अभिज्ञाचा आणखीन एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात हे दोघेही हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसून येते. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी मेहुलला कॅन्सरच्या आजाराशी झुंज द्यायला बळ मिळो असे म्हटले आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी अभिज्ञा भावे आणि मेहुल पै मोठ्या थाटात विवाहबंधनात अडकले होते. लग्नाला एक वर्ष पूर्ण होते न होते तोच कॅन्सरच्या बातमीमुळे मोठा धक्का बसला आहे.

अभिज्ञा भावेने यासंदर्भात मेहुलला उद्देशून त्याला अशा परिस्थित खंबीर साथ देणारी भावनिक पोस्ट लिहिली होती. स्वतःला गुंतवून ठेवत अभिज्ञा आता झी मराठीवरील मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २२ मार्चपासून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची मुख्य भूमिका असलेली तू तेव्हा तशी ही मालिका प्रसारित होत आहे या मालिकेत अभिज्ञा देखील महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच सुरू झाले असून सेटवर माजमस्ती करणारे फोटो हे कलाकार सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अभिज्ञा भावे हिने पवित्र रिश्ता २ या हिंदी मालिकेतून महत्वाची भूमिका बजावली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतलेला पाहायला मिळाला होता. प्यार की ये एक कहाणी, बडे अच्छे लगते है या हिंदी मालिका अभिनित केल्यानंतर अभिज्ञाने लगोरी, देवयानी, खुलता कळी खुलेना, कट्टी बट्टी, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा या मालिकेतून महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. यातून बहुतेकदा तिच्या वाट्याला विरोधी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे अभिज्ञा ही मराठी मालिका सृष्टीत खलनायिका म्हणून जास्त ओळखली जाते. तू तेव्हा तशी या मालिकेत देखील तिच्या वाट्याला अशाच स्वरूपाची तगडी भूमिका आली आहे असे प्रथमदर्शनी वाटते. मालिका पाहिल्यावरच अभिज्ञाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण मिळेल.