कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी मनात काळजीचे ढग दाटून येतात. घरातील एखादी व्यक्ती या दुर्धर आजाराने वेदना सहन करत असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला झळ बसत असते. पण कॅन्सर झालेल्या व्यक्तीला जितकी औषधांची गरज असते तितकीच, किंवा त्यापेक्षा जास्त बळ देत असतात ते त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची साथ. याच अनुभवातून सध्या मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री अभिज्ञा भावे. खरं तर ऑनस्क्रिन खलनायिकेच्या भूमिका जीव ओतून करणारी अभिज्ञा भावे खऱ्या आयुष्यात कॅन्सरशी लढत असलेल्या पती मेहुल याच्यासाठी नायिका ठरली आहे. त्याच्या उपचाराच्या काळात त्याला सकारात्मक वाटावे यासाठी त्याच्यासोबत एका ट्रेंडवर व्हिडिओ बनवत दोघांमधील टेलीपॅथीचे भन्नाट दर्शन तिने घडवले आहे.

अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांचे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न झाले. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याचे अनेक क्षण अभिज्ञाने सोशलमीडियावर शेअर केले होते. अभिज्ञा ही अभिनेत्री तर आहेच पण अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्यासोबत ती डिझायनर साडी आणि ज्वेलरीचा तेजाज्ञा हा ब्रँडही चालवते. त्यामुळे लग्नातील अभिज्ञाच्या लूकचीही खास चर्चा झाली होती. लग्नाच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा करत असतानाच अभिज्ञा आणि मेहुल यांच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि ते म्हणजे मेहुलला कॅन्सर असल्याचे निदान कळाले. अभिज्ञानेच ही गोष्ट शेअर केली. सध्या मेहुल कॅन्सरवरील उपचार घेत असून अभिज्ञा त्याला पुरेपूर साथ देत आहे. उपचार घेत असताना मेहुलच्या मनात नकारात्मक विचार येऊ नयेय यासाठी ती सतत काही ना काही रिल्स बनवत असते. अभिज्ञाने शेअर केलेल्या इन्स्टा व्हिडिओमध्ये ती मेहुलसोबत एक खेळ खेळत आहे. दोघांनीही डोळे बंद करून हाताची बोटे वेगवेगळ्या संख्येत दाखवयची. दोघांनी दाखवलेल्या बोटांची संख्या समान आली पाहिजे असा हा टास्क आहे. हे रिल्स करत असताना अभिज्ञा आणि मेहुल यांनी हा टास्क पूर्ण केला आणि त्यातून त्यांची टेलीपॅथी दिसून आली. या रिल्सनंतर मेहुलच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अभिज्ञाही तिचा आनंद लपवू शकली नाही. अभिज्ञा आणि मेहुल यांची लव्हस्टोरीपण खूप रंजक आहे. अभिज्ञा आणि मेहुल हे कॉलेजमध्ये एकत्र होते पण नंतर त्यांचा संपर्क तुटला. अभिज्ञाचे लग्न झाले.

पण दोन वर्षापूर्वी पुन्हा हे दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा अभिज्ञाचा घटस्फोट झाला होता. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अभिज्ञा म्हणते की तिचा नवरा मेहुल स्वभावाने इतका गोड आहे की मी फोनमध्ये त्याचा नंबर मेहुल नव्हे तर अॅपल असा सेव्ह केला आहे. कॅन्सर जरी मेहुलला झाला असला तरी त्याची प्रत्येक वेदना मी अनुभवू शकते इतकी मी त्याच्यामध्ये समरसून गेले आहे. मला त्याला या आजारातून बाहेर काढायचे आहे. मेहुलची काळजी घेत अभिज्ञा सध्या तू तेव्हा तशी या मालिकेत वल्ली हे पात्र साकारत आहे. यापूर्वी खुलता कळी खुलेना, लगोरी, तुला पाहते रे, देवयानी या मालिकेतील अभिज्ञाच्या भूमिका गाजल्या. आजवर बहुतांशी मालिकांमध्ये अभिज्ञाने नकारात्मक भूमिका केल्या असल्या तरी प्रत्यक्ष आयुष्यात नवरा मेहुलसाठी ती पॉझिटिव्ह सपोर्टसिस्टीम बनली आहे. अभिज्ञा नवऱ्याला देत असलेल्या या सोबतीबद्दल तिच्या चाहत्यांकडून तिचे कौतुक होत आहे.