गेल्या काही वर्षांपासून श्वेता शिंदे आणि झी मराठी वाहिनीचे नाते अगदी घट्ट होताना दिसत आहे. निर्माती म्हणून श्वेता शिंदे हिने लागीरं झालं जी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. या मालिकेला गावरान बाज असल्याने मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. अशाच धाटणीची मिसेस मुख्यमंत्री ही आणखी एक मालिका तिने प्रेक्षकांच्या समोर आणली. देवमाणूस या मालिकेचीही लोकप्रियता शिखरावर जाऊन पोहोचली होती. त्यानंतर देवमाणूस २ ही मालिका आणि आता अप्पी आमची कलेक्टर ही वेगळ्या धाटणीची मालिका तिने झी वाहिनीवर दाखल केली आहे. बाप लेकीच्या नात्यावर भाष्य करणारी अप्पी आमची कलेक्टर प्रेक्षकांची पसंती मिळवणार अशी आशा आहे.

अप्पीच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री शिवानी नाईक झळकणार आहे. ही तिची पदार्पणातली पहिलीच मालिका असल्याने शिवानी आपल्या भूमिकेबाबत खूप उत्सुक आहे. राज्यनाट्य स्पर्धा आणि एकांकिकामधून शिवानीने उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसं मिळवली आहेत. तर अर्जुनच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता रोहित परशुराम झळकणार आहे. रोहित परशुराम याने अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मिथुन या चित्रपटातून तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. राम सिया के लवकुश, देवी आदि पराशक्ती या हिंदी मालिका तसेच फुलाला सुगंध मातीचा, ज्ञानेश्वर माऊली, क्रिमीनल्स , रघु ३०५, आरं बा अशा मालिका आणि चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोहित हा मूळचा भोर गावचा. शरीरसौष्ठव म्हणून राष्ट्रीय पातळीवर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विक्रम गोखले यांच्याकडे गटाने अभिनयाचे धडे गिरवले होते. नाटकातून काम करत असताना त्याला एका मित्राने विरोधी भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी सुचवले. त्यानंतर मिथुन चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. वेगवेगळ्या मालिकेतून रोहित छोट्या मोठया भूमिका साकारू लागला.

श्वेता शिंदेने त्याला आपल्या मालिकेतून प्रमुख नायकाची भूमिका देऊ केली आहे. खरं तर श्वेता शिंदे याच कामासाठी ओळखली जाते तिने आपल्या मालिकांमधून नव्या चेहऱ्यांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे त्यामुळे अप्पी आमची कलेक्टर मालिकेतून शिवानी नाईक आणि रोहित परशुराम ही फ्रेश जोडी तुमच्यासमोर तिने आणली आहे. रोहित परशुराम आणि शिवानी नाईक यांच्यासोबत संतोष पाटील हे देखील मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतील वंदी आत्या म्हणजेच पुष्पा चौधरी या देखील या मालिकेचा भाग बनणार आहेत. अनेक जुने पण तितकेच प्रसिद्धी मिळवलेले कलाकार ह्या नव्या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे ह्या मालिकेची उत्सुकता देखील लागून राहिली आहे. नवी मालिका अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा!.