Breaking News
Home / जरा हटके / दिवंगत अभिनेते यशवंत दत्त यांची फॅमिली प्रथमच तुमच्या समोर मुलगा आणि सून आहेत कलाक्षेत्रात

दिवंगत अभिनेते यशवंत दत्त यांची फॅमिली प्रथमच तुमच्या समोर मुलगा आणि सून आहेत कलाक्षेत्रात

मराठी सृष्टीला ज्यावेळी नायकाची गरज होती त्यावेळी ती गरज अभिनेते यशवंत दत्त यांनी भरून काढली होती. भैरू पैलवान की जय, आपली माणसं, गनिमी कावा, युगपुरुष, नवरा माझा ब्रह्मचारी, फटकडी या आणि अशा कित्येक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यशवंत दत्त यांचे मूळ नाव आहे यशवंतसिंह महाडिक. ७ नोव्हेंबर १९४७ रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. यशवंत दत्त याचे आई आणि वडील दोघेही नाटक आणि चित्रपटातून अभिनय साकारत. ‘गरिबांचे राज्य’ हा चित्रपट त्यांनी काढला होता मात्र या चित्रपटामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले.

actor yashwant dutta mahadik
actor yashwant dutt mahadik

आपल्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटांमुळे यशवंत दत्त यांच्या वडिलांनी त्यांना अभिनय क्षेत्रात येण्यास मनाई केली होती मात्र कालांतराने तशी परवानगी त्यांना मिळाली. शाळेत असल्यापासूनच यशवंत दत्त नकला करण्यात पटाईत होते. शिक्षकांच्या हुबेहूब नकला केल्यामुळे त्यांना कित्येक वेळा वर्गाबाहेर उभे राहावे लागत. पुढे घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली तर कधी मिळेल ती छोटी मोठी कामे केली. शेवटी फिलिप्स कंपनीत ते कामगार म्हणून रुजू झाले. राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका असा अभिनयाचा प्रवास सुरु असताना ‘नाथ हा माझा’ या नाटकाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटातून नायकाच्या भूमिका साकारत असताना सुगंधी कट्टा, सरकारनामा मधील त्यांच्या अभिनयाने रंगवलेले खलनायक तितक्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर उभे राहिले. शापित , संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ११ नोव्हेंबर १९९७ रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी यशवंत दत्त यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे वक्त्यव्य अनेकांनी केले होते.

akshay yashwant dutta mahadik
akshay yashwant dutt mahadik

यशवंत दत्त यांचे कुटुंबीय मात्र ग्लॅमरस दुनियेत सक्रिय असलेले पाहायला मिळते. त्यांचा मुलगा “अक्षय यशवंत दत्त महाडिक” हा मराठी चित्रपट दिग्दर्शक आहे. अभिनय क्षेत्रात न येण्याचे कारण त्यानेच सांगितले होते की, ‘मी जर अभिनय क्षेत्रात आलो तर माझी तुलना माझ्या वडिलांशी केली जाईल त्यामुळे मी दिग्दर्शनाकडे वळलो. माझे वडील ज्यावेळी चित्रपटातून लोकप्रिय झाले त्यावेळी मी खूपच लहान होतो परंतु ज्यावेळेस मी त्यांचे काम बघायचो त्यावेळी मी स्वतःला खूप नशीबवान समजायचो की मी त्यांचा मुलगा आहे, दुर्दैवाने मला त्यांचा खूप कमी सहवास लाभला’. अक्षय महाडिकने इंजिनिअरिंग आणि बिजनेसमॅनेजमेंट केलं आहे. एक वेगळा विषय घेऊन आणि वेगळे कलाकार घेऊन त्याने धागेदोरे, आरंभ, ७ रोशन व्हीला यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले. अक्षयची पत्नी ‘वेदांती भागवत महाडिक’ ही कथक नृत्यांगना आहे. Layom institute of Art’s and Media नावाने तिची पुणे, कोथरूड येथे नृत्य संस्था आहे ज्यातून आजवर अनेक विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे तिने दिले आहेत. एवढेच नाही तर भारतभर होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या मंचावरून तिने आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली आहे. अक्षय आणि वेदांती यांना ‘ओवी’ ही एकुलती एक कन्या आहे. ओवी देखील आपल्या आईकडून नृत्याचे धडे गिरवत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *