गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं कपल म्हणजे अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे. नाटकाच्या आवडीतून दोघांची मैत्री झाली. डावीकडून चौथी बिल्डिंग या विराजसनेच लिहिलेल्या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलेल्या या जोडीने मैत्रीचे रूपांतर नुकतेच लग्नबंधनात केले. खरंतर विराजस आणि शिवानी यांच्यातील अफेअरच्या चर्चा रंगतच होत्या, पण दोघांनीही त्यांचं नातं कधीच लपवून ठेवलं नाही. काही दिवसांपूर्वी गोव्यात एका क्रूझवर विराजसने शिवानीच्या बोटात अंगठी घालून साखरपुडा केला होता. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या तारखेकडे चाहत्यांचे लक्ष होते.

गेल्या दोन दिवसांपासून मेहंदी, हळद या कार्यक्रमाचे व्हिडिओ दोघांनी शेअर केले. ३ मे रोजी सायंकाळी विराजस आणि शिवानी यांचं थाटामाटात लग्न झालं. फायनली…. इतकीच कॅप्शन देत शिवानी आणि विराजस यांनी त्यांच्या इन्स्टापेजवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. विराजसच्या आयुष्यात त्याची मैत्रीणच त्याची बायको म्हणून यावी इतकीच अपेक्षा आहे असं म्हणत विराजसच्या आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या दोघांच्या नात्याला हिरवा कंदील दिला होता. शिवानी आणि विराजस हे कॉलेजपासूनचे मित्र असल्याने त्यांच्यात खूप छान केमिस्ट्री आहे. अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या ढेपेवाड्यात झालेल्या लग्नात शिवानी आणि विराजस यांनी मॅचिंग कॉम्बो ड्रेसिंग केलं तेव्हाच त्याच्यात काहीतरी खास रिलेशन असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले. त्यानंतर नेहमीच ही जोडी एकत्र फोटोसेशन करताना आणि ते फोटो शेअर करताना दिसली. दोन दिवसांपूर्वी शिवानीचा मेंदी इव्हेंट रंगला. हिरव्या रंगाच्या पारंपरिक वनपीस ड्रेसमध्ये फ्लावरज्वेलरी घातलेली शिवानी कमालीची सुंदर दिसत होती.

ती नेहमी विराजसला विऱ्या अशी हाक मारते. हेच नाव तिने तिच्या मेंदीमध्ये लिहिलं आहे. तर विराजसने शिवानी अशी अक्षरे मेंदीमध्ये लिहिली. हळदीसाठीही पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दोघांनी धमाल केली. ३ मे ला मित्रपरिवार आणि कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत दोघांनी वैवाहिक जीवनाला सुरूवात केली. माझा होशील ना या मालिकेतून विराजसने टीव्ही विश्वात पदार्पण केले. त्याआधी विराजस हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर सक्रिय होता. विराजस अभिनयासोबत लेखनही करतो. शिवानीने काही दिवसांपूर्वी सांग तू आहेस का या मालिकेत वैभवी हे पात्र रेखाटले होते. तर रमाबाई आंबेडकर ही तिची भूमिका खूप गाजली.