लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक विरंगुळा म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबचा वापर जास्त झालेला पाहायला मिळतो आहे. त्यात बहुतेकदा कॉमेडी व्हिडीओज आणि म्युजिक डान्स व्हिडिओजना जास्त पसंती दर्शवलेली पाहायला मिळते परंतु यात जर तुम्हाला अस्सल आगरी कोळी कॉमेडी पहायची असेल तर विनायक माळी हे नाव चर्चेत असलेलं दिसत. आगरी किंग म्हणून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा विनोदी कलाकार आपल्या हलक्या फुलक्या विनोदाने चाहत्यांची मने जिंकून घेत आहे. आगरी कोळी भाषेतला एक वैतागलेला मराठी माणुस म्हणून स्वतःवर विनोद करून प्रेक्षकांची मने जिंकणारा विनायक माळी नक्की आहे तरी कोण? त्याचं शिक्षण काय? तो आज इतका फेमस कसा काय झाला? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत….

रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये २२ सप्टेंबर १९९५ साली एका सर्वसाधारण कुटुंबात विनायक माळी ह्याचा जन्म झाला. विनायकचे वडील कोर्टात सरकारी नोकरी करतात. नोकरीनिमित्त वडील सहकुटुंब ठाण्यात वास्तव्यास आहेत. विनायकचं संपूर्ण शिक्षण ठाण्यातच झालं त्याने एलएलबी केलं आहे. ठाणा कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना त्याने एक शॉर्ट फिल्म बनवली. त्यात त्याला चांगलं यश आलं आणि पुढे त्याने ह्यातच करियर करायचं ठरवलं. याआधीही त्याने ऍड एजन्सीमध्ये फ्री लँसिन्ग केलं आहे. त्यामुळे त्याला ह्यातच करियर करण्यात आणि व्हिडिओ एडिटिंग करण्यात खूप सोपं गेलं. व्हिडिओ बनवता बनवता तो विप्रो कंपनीत जॉब देखील करत होता पण जॉब चा टाइम सूट होत नसल्यामुळं त्यानं ती चांगल्या पगाराची नोकरी करणं सोडून दिल. सुरवातीला त्याने अनेक हिंदी भाषिक व्हिडिओ केले पण त्यात त्याला खूप अपयश आलं. त्यामुळे त्याने ते हिंदी व्हिडिओ बनवणं सोडून आपल्या रांगड्या आगरी कोळी भाषेत व्हिडिओ बनवायला सुरवात केली. हे व्हिडिओ बनवताना त्याला त्याच्या मित्रांचे खूप सहकार्य लाभले. सुरवातीला छोटे व्हिडीओ बनवून त्याने ते उपलोड केले मग त्याचा आढावा घेत प्रेक्षकांना काय पाहायला आवडत हे शोधलं विनोद हा आधी स्वतःवर करता आला पाहिजे हे त्याने ओळखलं आणि पुन्हा नव्याने व्हिडिओ बनवायला सुरवात केली. प्रथमच “आम्ही आगरी कोळी पोरं” हा त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
त्यानंतर त्याने “दादूस गेला जिमला” “माझी बायको” हे व्हिडिओ बनवले त्याला लोकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने केलेले “दादूस गेला पत्रिका वाटायला”, “दादूस गेला कर्नाळ्याला”, “दादूस गेला हळदीला” असे एका पाठोपाठ एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर बोलबाला केला. हे व्हिडिओ व्हायरल होण्यामागे देखील एक कारण आहे ते म्हणजे विनायक हे व्हिडिओ रिअल स्पॉट वर जाऊन करतो शिवाय त्यात तो तेथील लोकांना देखील सहभागी करून घेतो ह्यामुळे त्याचा फॅन फॉल्लोवर वाढायला खूप मदत झाली. त्यामुळे त्याचे व्हिडिओ हे रियलिस्टिक वाटतात. एक वैतागलेला माणूसच नाही तर त्याने साकारलेला शेठ माणूस देखील लोकांना फारच आवडला. या अलौकिक प्रसिद्धीच्या मागे विनायकला काही प्रसंगी लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. शिक्षकी पेशेवर केलेल्या त्याच्या विनोदावर अनेकांनी आक्षेप नोंदवले होते त्यावेळी विनायकने खंत व्यक्त केली होती. विनोद हा विनोद म्हणून पाहिला जावा त्याला कुठले वेगळे वळण दिले तर मग कुठल्याच गोष्टीवर विनोद करणे अवघड होईल असे म्हणून तो हताश देखील झाला होता. परंतु लोकांच्या प्रोत्साहनामुळे आणि त्याच्या तमाम चाहत्यांमुळे तो पुन्हा एका नव्या उमेदीने प्रेक्षकांसमोर आला आणि तितक्याच दणक्यात हिट देखील झाला. या प्रवासात त्याला मराठी सृष्टीची साथ मिळाली. आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून तो मराठी चित्रपटांचे प्रमोशन करू लागला. त्यावरून विनायक सामान्य लोकांमध्येच नाही तर सिने सृष्टीतही लोकप्रिय ठरला. सुखाचे आणि दुःखाचे धक्के प्रवासात अनुभवत असताना विनायक खूप काही शिकला आहे हे सर्वपरिचित आहे. विनायकच्या विनोदी बुद्धीला आणि त्याच्या कौशल्य बुद्धीला सलाम असाच आणखी यशस्वी होत राहा आणि यशाची उंचच उंच शिखरे गाठत राहा हीच सदिच्छा…