
प्रसिद्ध गायक मिका सिंग टीव्ही माध्यमातून छोट्या पडद्यावर लग्न करणार आहे. स्टार भारत या वाहिनीवर मिकाचे स्वयंवर रचण्यात आले आहे. ‘स्वयंवर मिका दी वोटी’ या नव्या रिऍलिटी शोचा ग्रँड पिमियर रविवारी १९ जून रोजी पार पडला. यावेळी मिका सोबत ज्या १२ जणी लग्न करण्यास उत्सुक आहेत त्यांची ओळख करून देण्यात आली होती. या ग्रँड प्रीमियरला दिलेर मेहेंदी, कपिल शर्मा सह अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. या स्वयंवरमध्ये सहभागी झालेल्या १२ जणींमध्ये मिका सिंग कोणाची निवड करणार याची हिंदी सृष्टीत जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

देशभरातून ४३ वर्षाच्या मिका सिंग सोबत लग्न करण्यासाठी ज्या १२ जणींनी सहभाग घेतला आहे त्यात एका मराठमोळ्या सेलिब्रिटीची देखील मुलगी आहे. ध्वनी पवार असे या स्पर्धकाचे नाव आहे जी या स्वयंवर मध्ये सहभागी होऊन मिका सिंगचे मन जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसणार आहे. ध्वनी पवार ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे यासोबतच ध्वनीने काही शोचे सूत्रसंचालन केले आहे, तिला गाण्याची देखील उत्तम जाण आहे. अनिमेशन शो साठी तिने व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचे काम केले आहे. बळी या मराठी चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त ध्वनी पवार चला हवा येऊ द्या च्या मंचावर देखील उपस्थित राहिली होती. ध्वनी ही हिंदी सृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार विजय पवार याची मुलगी आहे. हिंदी सृष्टीत आजवर अनेक मराठी कलाकारांनी आपली एक वेगळी ओळख जपली आहे. अशातच विजय पवार हिंदी कॉमेडी शोमधून व्हीआयपी या नावाने लोकप्रिय झाले आहेत. कॉमेडी सर्कस, देख इंडिया देख, कॉमेडी नाईट्स, कॉमेडी क्लासेस, बाकरवडी, द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा अशा वेगवेगळ्या शोमधून त्याने हास्याची धमाल उडवून दिली आहे. स्वप्नील जोशी आणि विजय पवार या दोघांनी एकत्रित पणे कॉमेडी शोमध्ये फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला होता.

बोल बच्चन या बॉलिवूड चित्रपटात त्याला अभिनयाची संधी मिळाली होती. सजन रे झूठ मत बोलो , हम सब उल्लू है अशा चित्रपटातून तो विनोदी भूमिकेत पाहायला मिळाला. व्हीआयपी म्हणून ओळख मिळवलेला विजय जवळपास १५० कलाकारांची मिमिक्री करण्यात पटाईत आहे. विजयच्या पावलावर पाऊल टाकत त्याची मुलगी ध्वनी ने देखील आता हिंदी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून कार्यक्रमासाठी ध्वनीला एक सेलिब्रिटी म्हणून आमंत्रित करण्यात येते. स्वयंवर मिका दि वोटी या शोमुळे ध्वनी प्रकाशझोतात आली आहे. या शोमध्ये ध्वनी सोबत सोनल तीलवानी, प्रांतिका दास, चंद्राणी दास, बुशरा शेख, आश्लेषा रावले अशा १२ जणींनी सहभाग घेतला आहे. गायक शान याने हा शो होस्ट केला आहे. या १२ जणींमधून मिका सिंग कोणाची निवड करणार याची शेवटपर्यंत उत्सुकता लागणार आहे. त्यात मराठी मुलगी म्हणून ध्वनी पवार बाजी मारणार का याचीही जिरदार चर्चा आहे.