जसजशी दिवाळी जवळ येते तसतसे टीव्ही माध्यमातून ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ अशी जाहिरात न चुकता पाहायला मिळते. दिवाळीची चाहूल खर तर याच जाहिरातीमुळे सर्वांना महिन्याभरापासूनच लागलेली असते. या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच परिचयाचे झालेले आहेत. हे अलार्म काका म्हणजेच ज्येष्ठ कलाकार ‘विद्याधर करमरकर ‘ होय. खेदाची बाब म्हणजे ह्या वर्षीची दिवाळी या अलार्म काकांच्या विरहात साजरी करावी लागणार आहे. गेल्या वर्षी वयाच्या ९६ व्या वर्षी विद्याधर करमरकर यांचे दुःखद निधन झाले होते. त्यामुळे ह्या काकांना प्रत्येकजणच खूप मिस करणार आहेत.

विद्याधर करमरकर हे हिंदी चित्रपट अभिनेते म्हणूनही ओळखले जात. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक जाहिराती साकारलेल्या आहेत मोती साबणाची त्यांची जाहिरात विशेष लक्षवेधी ठरल्याने ते कायम स्मरणात राहतील. विद्याधर करमरकर यांना सगळेजण ‘आबा’ म्हणून ओळखायचे. मुंबईत विलेपार्ले येथे ते वास्तव्यास होते. सुरुवातीच्या काळात नोकरी करून त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली होती. वार्षीकोत्सव कार्यक्रमात ते नेहमी हिरीरीने सहभागी व्हायचे. त्यात अनेक नाटकांचे सादरीकरण त्यांनी केले होते तर कधी नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुपम खेर, दोस्ती यारीयां मनमर्जीया , सास बहु और सेन्सेक्स, लंच बॉक्स , एक थी डायन, एक व्हिलन यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी कधी वडील तर कधी आजोबांच्या भूमिका साकारल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात देखील त्यांनी स्वतःची ओळख बनवली होती. मोती साबण, इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट अशा नामवंत जाहिरातीतून त्यांनी काम केलं होतं. नव्वदीच्या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच होता.

एकदा चित्रपटाच्या शुटिंगवेळी आपले अलार्म काका म्हणजेच अभिनेते विद्याधर करमरकर आजारी पडले होते त्या अवस्थेतही विद्याधर करमरकर यांनी अगोदर आपले दिलेले काम पूर्ण करण्यावर अधिक भर दिला होता. गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर म्हणजेच २० सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी विद्याधर करमरकर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली होती. आता लवकरच दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या अलार्म काकांना विसरून कसे चालणार? टीव्हीवर देखील आजही अलार्म काकांची ती जाहिरात कित्तेक जीवसापासून पाहायला मिळत आहे आणि यापुढे देखील ती जाहिरात अनेक वर्ष दिवाळीत तरी नक्कीच पाहायला मिळेल अशी आहे. किमान या माध्यमातून तरी अभिनेते विद्याधर करमरकर काका प्रेक्षकांच्या स्मरणात राहोत एवढीच अपेक्षा…