टपाल, लालबागची राणी, मिमी, लुका छुपी या चित्रपटाच्या यशानंतर लक्ष्मण उतेकर लवकरच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक मोठा बिग बजेट ऐतिहासिक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मराठी प्रमाणेच बॉलिवूड सृष्टीला आता ऐतिहासिक चित्रपटांची ओढ लागली आहे. तानाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटाची भुरळ देशभरातील तमाम प्रेक्षकांना पडली होती. याच अनुषंगाने लक्ष्मण उतेकर यांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे ठरवले. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांनी विकी कौशलच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता. त्यानुसार आता विकी कौशलने हा चित्रपट स्वीकारला असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणे हे खरं तर खूप मोठे आव्हानात्मक काम आहे.

या भूमिकेसाठी विकी कौशलने तयारी सुरु केलेली आहे. घोडेस्वारी, तलवारबाजी याचे प्रशिक्षण तो घेत असल्याचे सांगितले जाते. चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होईल असेही म्हटले जात आहे. चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार हे निश्चित झाले असतानाच महाराणी येसूबाईंची भूमिका कोण साकारणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. मात्र आता ही भूमिका सारा अली खान साकारणार असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सारा अली खान ही भूमिका उत्तम निभावेल असा विश्वास लक्ष्मण उतेकर यांना आहे. लक्ष्मण उतेकर हे सिनेमॅटोग्राफर तसेच दिग्दर्शक म्हणून हिंदी मराठी सृष्टीत वावरले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या सृष्टीत कार्यरत असून दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे. आता त्यांची ओढ ऐतिहासिक चित्रपटांकडे आहे त्यामुळे अशा धाटणीचा चित्रपट बनवण्याचा त्यांचा मानस आहे. या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे येत्या काही दिवसात समोर येईल तूर्तास लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे नाव अजून ठरवलेले नाही त्यामुळे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात शेवटपर्यंत टिकून राहील यात शंका नाही. चित्रपटाच्या शूटिंगला येत्या काही दिवसात सुरुवात होईल असे बोलले जात आहे.

या भूमिकेसाठी विकी कौशल आणि सारा अली खान या दोघांनाही मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. घोडेस्वारी, तलवारबाजी असे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे. दरम्यान विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने प्रेक्षकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र तो ही भूमिका उत्तम निभावेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. उरी चित्रपटामुळे विकी कौशलला चांगली लोकप्रियता मिळवली होती. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने त्याला ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत आहे. या भूमिकेसाठी विकी खुपच उत्सुक आहे मात्र आता प्रेक्षक त्याला या भूमिकेत कसे स्वीकारतात याची उत्सुकता अधिक आहे. या चित्रपटामुळे महाराजांचे कर्तृत्व सर्वदूर पसरेल अशी आशा लक्ष्मण उतेकर यांना आहे.