मराठी सृष्टीत खलनायक वठवणाऱ्या कलाकारांमध्ये राजशेखर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. खरं तर ही भूमिका साकारण्यासाठी त्यांना कुठल्याही मेकअपची गरजच नव्हती. बेरकी नजर आणि आवाजातला करारेपणा हाच त्यांच्या खलनायकी भूमिकेसाठी पुरेसा असायचा. गणपत पाटील यांच्या ऐका हो ऐका या नाटकातून राजशेखर यांनी रंगभूमीवर आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं. आकाशगंगा हा त्यांचा पहिला चित्रपट , यात त्यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. मात्र आयुष्याला कलाटणी देणारा एक क्षण त्यांच्याकडे आला. मोहित्यांची मंजुळा या चित्रपटात त्यांनी खलनायक रंगवला. या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि पुढे अशाच भूमिकांसाठी त्यांना निवडण्यात येऊ लागले. लाखात अशी देखणी, वारणेचा वाघ, ज्योतिबाचा नवस, धर्मकन्या, देवा तुझी सोन्याची जेजुरी, मल्हारी मार्तंड, बारा वर्षे सहा महिने तीन दिवस अशा चित्रपटांमधून त्यांनी खलनायकाच्या भूमिका लीलया पेलल्या.

यामुळे केवळ मराठी चित्रपटातच नाही तर हिंदी चित्रपटातून देखील राजशेखर यांना अभिनयाची संधी मिळत गेली. निळू फुले यांच्यानंतर मराठी चित्रपटातून खलनायक कोणी रंगवला असेल तर तो राजशेखर यांनीच. चित्रपटातून खलनायकाच्या भूमिका साकारणारे राजशेखर मात्र खऱ्या आयुष्यात खूप हळवे होते. राजकारण हा आपला पिंड नाही असे मानणाऱ्या राजशेखर यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला आणि मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना केली. कोल्हापूर जिल्ह्यातील चंबूखडी येथे त्यांचे मातोश्री वृध्दाश्रम अविरत सेवा पुरवत आहे. राजशेखर यांच्या पश्चात या वृद्धाश्रमाची जबाबदारी त्यांच्या पत्नी वैशाली राजशेखर यांनी त्यांच्या खांद्यावर समर्थपणे पेलली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या या वृध्दाश्रमात राहून वृद्धांची आपुलकीने काळजी घेत आहेत . या समाजसेवेत त्यांनी स्वतःला झोकून दिलेले आहे. या योगदानासाठी त्यांना भगिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही काळ त्यांनी शिवसेना जिल्हा आघाडीच्या जिल्हा प्रमुख पदी जबाबदारी सांभाळली होती. आयुष्याच्या या व्यस्त प्रवासातून काही काळ त्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे अंथरुणाला खिळून राहिल्या होत्या. मात्र या दुखण्यातून त्यांनी स्वतःला सावरलं आहे . आपली आई स्वस्थ बसणाऱ्यातली नाही हे जाणून असणारा त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी आपल्या आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेता स्वप्नील राजशेखरने या पोस्टमध्ये आपल्या आईबद्दल नेमकं काय म्हटलं आहे ते पाहुयात , ” या वर्षी जानेवारी मधे आईच्या मणक्याच्या चकतीचं ऑपरेशन झालं… त्याआधी महिनाभर असह्य वेदनांनी ती अंथरुणाला खिळली होती. कळत्या वयापासुन ते आज ८० वयापर्यंत स्वावलंबी आणि सतsत कार्यरत असणाऱ्या आणि तीच जगण्याची मूळ प्रेरणा असणाऱ्या आईसाठी असं अंथरुणावर पडुन रहाणं आणि परावलंबत्व हे मणक्यांच्या वेदनांपेक्षा भीषण होतं.

ऑपरेशन नंतरही पुढे चार महिने बेड रेस्ट सांगीतली होती. हालचालीवर निर्बंध होते. डॉक्टर म्हणाले “आता हे पुढचं आयुष्य बोनस म्हणुन घ्या… स्वस्थ बसुन रहा.. जादु होणार नाही.. तुमचं तुम्हाला बाथरुमपर्यंत जाता येईल तेवढं नशिब मानायचं.. आश्रमाचं काम तर सोपवा ईतरांवर..” त्यांचं म्हणणं अगदी करेक्ट होतं. आईने त्यांचं सगळं ऐकुन घेतलं, शक्य होईल तेवढाच संयम ठेवला, हळुहळु हलचाली सुरु केल्या, आत्मविश्वास म्हणजे ठेवणीला खंडीभर चारेक महिन्यात चालु लागली वृध्दाश्रमाची कामं बेडवर पडल्यापडल्या सुरु होतीच. तिथेच राहिली होती. थोडं चालता फिरता यायला लागल्यावर तीने पुर्ववत दिनचर्या सुरु केली.. रोज घरातुन आश्रमात जाणं, दिवसभर तिथली कामं करुन संध्याकाळी घरी परत येणं, सगळं रीतसर सुरु तिला थांबवणं आमच्या हातात नाही.. अन त्याचा उपयोग नाही… तिचं काम सुरुय, तर ती सुखरुप सुरुय हे आम्हालाही माहितीय परवा अक्कलकोट तुळजापुरला जायचंच म्हणुन हट्ट केला.. “आता कुठे तुला जेमतेम चालता येतंय, हा एवढा प्रवास, दगदग कसं झेपणार?!” या प्रश्नावर तीचा आत्मविश्वास आणि श्रध्दा एवढंच उत्तर…जातायेता १८ तासांचा कारचा प्रवास, सगळी अनिवार्य पायपीट, प्रवासात बऱ्या टॉयलेटस अभावी होणारी कुचंबणा जी आपल्याकडे बाईच्या जन्माला पुजलेली सगळं निभावलं तीने तिथं एके ठिकाणी रिक्षात मागे चढुन बसणं तिला शक्य नव्हतं, तर असं सगळंय… अपने घर मे भी बच्चन है