“माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री” असं म्हणत अभिनेता सुयश टिळकने जुलै महिन्यात अभिनेत्री आयुषी भावे हिच्यासोबत साखरपुडा केला होता. आपल्या आयुष्यात आलेला हा सूंदर क्षण त्याने चाहत्यांसोबत शेअर केलेला पाहायला मिळाला होता. तर नुकतेच सुयश आणि आयुषीचे केळवण साजरे करण्यात आले होते. अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेत्री मृणाल देशपांडे यांनी त्यांचे केळवण केले होते. या बातमीने सुयश आणि आयुषी लवकरच लग्न करणार आहेत हे समजले होते. दोन दिवसांपासून आयुषी आणि सुयशच्या घरी लगीनघाई सुरू झालेली आहे.

काल १९ ऑक्टोबर रोजी त्यांचा मेहेंदि सोहळा आणि हळदीचा सोहळा पार पडला. त्यांच्या हळदीच्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात सुयशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता तर आयुषी पिवळ्या रंगाच्या साडीत अधिकच खुलून दिसली होती. मेहेंदि आणि हळदीच्या सोहळ्यात त्यांनी मोजक्याच मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना आमंत्रित केले होते. तर बुधवारी आयुषी आणि सुयशचा संगीत सोहळा पार पडला. यात या दोघांनी किती सांगायचंय मला…, मन धागा धागा रेशमी…यासारख्या मराठी गाण्यांवर ठेका धरलेला पाहायला मिळाला. त्यांच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१ रोजी आयुषी आणि सुयश टिळक यांचा विवाह संपन्न झाला आहे. त्यांच्या या लग्नाला नातेवाईक, मित्रमंडळी आणि हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे अशा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे. आयुष्याच्या या नव्या वाटचालीला सेलिब्रिटींनी देखील त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

आयुषी हि एक अभिनेत्री असून तिने २०१८ साली श्रावण क्वीनचा किताब मिळवला होता. ह्याच बरोबर ती झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये देखील झळकली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी मराठी चित्रपटातही दिसणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे “या गावच कि त्या गावच”. आयुषी भावे हि एक उत्तम डान्सर असल्याने तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. बरखा या व्हिडीओ सॉंग मधून देखील ती प्रेक्षकांसमोर आली आहे. का रे दुरावा, पुढचं पाऊल या मालिकेमुळे सुयशला प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान सुयश टिळक शुभमंगल ऑनलाइन या मालिकेनंतर आता कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसत नाही पण लग्नानंतर काही दिवसातच तो पुन्हा सक्रिय होईल. आयुषी आणि सुयशला या नवदाम्पत्याना वैवाहिक आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन…