दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून सुव्रत जोशीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतानाच त्याने नाट्यस्पर्धा, एकांकिका मधून सहभाग दर्शवला होता. पुरुषोत्तम करंडकमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयाला पारितोषिक मिळाले होते. खरं तर सुव्रतला पत्रकारिता करायची होती मात्र अभिनय क्षेत्रातही आपण काही करू शकतो याची शाश्वती त्याला वाटू लागली. त्यासाठी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून त्याने अभिनयाचे धडे गिरवण्यास सिरुवात केली. दिल दोस्ती दुनियादारी मालिका लोकप्रिय झाल्यानंतर दिल दोस्ती दोबारा, अमर फोटो स्टुडिओ, डोक्याला शॉट, जॉबलेस, मन फकिरा अशा मालिका, चित्रपट, नायक तसेच वेब शो मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार मिळाली ती म्हणजे सखी गोखले. लग्नानंतर हे दोघेही नाटक, जाहिरात क्षेत्रात एकत्रित झळकलेले पाहायला मिळाले. अनन्या आगामी चित्रपटात सुव्रत महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे हृता दुर्गुळे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. सुव्रत जोशी हा समोर पाहिल्यावर जितका शांत वाटतो तितकाच तो खट्याळ देखील आहे. मातृदिनाच्या दिवशी आपल्या लहानपणीचा एक किस्सा त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आपल्या आईने कधीही आपल्यावर हात उचलला नाही मात्र तरीही ती मला खूप मारते, चटके देते असा तो आरडून ओरडून सगळ्यांना कळावं म्हणून बाल्कनीत येऊन धिंगाणा घालायचा. आपले ओरडणे ऐकून शेजारच्या काकू त्याच्या आईकडे आल्या मात्र समोरचे चित्र पाहून त्यांना हसावे की रडावे हेच समजेनासे झाले होते हा किस्सा नेमका काय होता ते जाणून घेऊयात…या बाईने माझ्यावर कधीही हात उचलला नाही. पण लहानपणी मी बाल्कनीत जाऊन उगाचच नाटक म्हणून “आई मारू नको ग, उदबत्तीचे चटके नको! गरम तवा नको” वगैरे आरडाओरडा करायचो! ती खदाखदा हसायची…

एकदा आमच्या बिल्डिंग मधे राहणाऱ्या शिक्षिका माझा आवाज ऐकून वर आल्या आणि आईला म्हणाल्या “अहो, लहान मुलांना असे मारत जाऊ नका.” आई शांतपणे त्यांना बाल्कनीत घेऊन आली. मी हातात प्लास्टिकचा स्टंप घेऊन उशीवर जोरजोरात आपटत होतो. वर एकटाच ‘आई मारू नको,मारू नको’ असं भेकत होतो. हे दृश्य बघून त्या शेजारीण बाईना हसावं की रडाव ते कळेना. त्या गेल्यावर मी आणि आई मात्र पोट दुखेपर्यंत हसलो. मी निर्माण करत असलेल्या चांगल्यावाईट सर्व नाटकाला प्रोत्साहन देणारा माझा हक्काचा प्रेक्षक, माझ्या सर्व मर्कटलीलांकडे लीलया दुर्लक्ष करून स्थितप्रज्ञता मिळवलेली शहाणी स्त्री अर्थात “माझी आई” हिला खूप प्रेम. आणि माझ्या निर्मितीला भाव न देऊन सांगते कुणाला? शेवटी मी तिचीच निर्मिती आहे!