काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधव पत्नी तृप्ती अक्कलवार यांच्या संसारात काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू होती. तृप्ती आणि सिद्धार्थ घटस्फोट घेत आहेत, ते वेगळे राहत आहेत आणि तृप्तीने सोशल मीडियावरून तिच्या नावासमोरील जाधव आडनाव हटवल्याने या चर्चेला अधिकच दुजोरा मिळत गेला. मात्र ही चर्चा पाहून सिध्दार्थने यावर मौन सोडलेलं पाहायला मिळालं. आमच्यात सर्व काही व्यवस्थित आहे असेही त्याने जाहीरपणे सांगितलेलं दिसलं. त्यानंतर या गोष्टीला कुठेतरी पूर्णविराम मिळालेला पाहायला मिळाला. तृप्तीचा आपल्या संसारात किती मोठा वाटा आहे हे सिद्धार्थ नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून सांगताना दिसतो. तृप्तीने पत्रकारितेची पदवी मिळवली आहे तसेच ती व्यावसायिक देखील आहे. स्वira या नावाने तृप्तीने कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.

त्यामुळे सिद्धार्थच्या संसाराला तिचाही हातभार लागत आहे. २ डिसेंबर रोजी सिध्दार्थची प्रमुख भूमिका असलेला बालभारती हा चित्रपट प्रदर्शित होत आहे यासोबतच तो रोहित शेट्टीच्या सर्कस या बॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे. यानिमित्ताने मीडियाला त्याने मुलाखत दिली यावेळी तो आपल्या पत्नीबद्दलही भरभरून बोलताना दिसला. सिद्धार्थ म्हणतो की, ‘ आम्हाला मुलं होण्याअगोदरच तृप्तीने ठरवलं होतं की आमच्या मुलांचं शिक्षण चांगल्या शाळेत करायचं. तृप्ती पत्रकार देखील होती मात्र मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी, संसाराच्या व्यापात तिचं याकडे दुर्लक्ष होत गेलं. मी बाहेर असताना माझ्या दोन्ही मुलींच्या अभ्यासाची जबाबदारी तिनेच घेतली होती. त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं हे तिने अगोदरच पक्क ठरवून ठेवलं होतं. त्यामुळे स्वरा आणि इरा आमच्या या दोन्ही मुली बॉम्बे स्कॉटिश कॉन्व्हेंट स्कुलमध्ये शिक्षण घेत आहेत. तृप्ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे. आमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी तीच घेत आहे. त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा सर्व खर्च तृप्ती स्वतः करते. तिने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे मी फक्त तिच्या निर्णयाला हो म्हटलं. कारण ती जे निर्णय घेते ते कधीच चुकत नाहीत.’ सिध्दार्थच्या या स्पष्टीकरणानंतर तृप्ती आणि सिध्दार्थच्या नात्यात सगळं काही आलबेल आहे असेच दिसून येते.

सिद्धार्थ आणि तृप्तीचं लव्ह मॅरेज आहे. जेव्हा तृप्ती पत्रकारितेची पदवी घेत होती तेव्हा तिने राम भरोसे या नाटकासाठी ऑडिशन दिली होती. तिथेच या दोघांची ओळख झाली होती. सिध्दार्थच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिल्याच भेटीत त्याला तृप्ती आवडू लागली. मात्र काही कारणास्तव तृप्ती हे नाटक करणार नाही असे कळल्यावर सिध्दार्थने स्टेजवर जाऊन तृप्तीला प्रपोज केले होते. सिध्दार्थने केलेला हा प्रकार तृप्तीला बिलकुल आवडला नाही. पण कालांतराने दोन तीन वर्षांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर तृप्तीने त्याला आपला होकार कळवला होता. आता २ मुली आई वडील असं सगळ्यांना सांभाळत असतानाच त्यांच्यात काय बिनसलं कोण जाणे. पण गेल्या काही महिन्यांपासून दोघांत दुरावा असल्याचं दिसून येतंय. सिद्धार्थच्या पत्नीने सोशल मीडियावरून जाधव हे आडनाव काढून टाकलं आणि हे दोघे एकमेकांपासून दुरावले असल्याच्या चर्चाना उधाण आलं.