काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी भाड्याचे घर सोडले होते. मात्र या घराच्या खूप साऱ्या आठवणी आम्ही सोबत घेऊन जात आहेत असे तो एका पोस्टद्वारे म्हणाला होता. सिद्धार्थ आणि मिताली मयेकर यांनी २०२१ साली लग्नगाठ बांधली. लग्नाअगोदरच हे दोघे लिव्हइन रिलेशन मध्ये राहत होते. गोरेगावच्या आरे जंगला नजीक त्यांनी भाड्याने घर घेतले होते. या घरातून आरे जंगलातील बिबट्याचे दर्शन सिध्दार्थने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. सिद्धार्थ आणि मिताली मधली नोकझोक, त्यांचे यशापयश या घराने अनुभवली आहेत त्यामुळे हे घर या दोघांसाठी खूपच खास ठरले होते.

मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांनी या भाड्याच्या घराला निरोप दिलेला पाहायला मिळाला. गुढीपाडव्याच्या दिवशी सिद्धार्थ आणि मितालीने नवीन घर खरेदी केल्याची बातमी चाहत्यांना कळवली होती. मुंबईत घर घेणे हे सामान्यांच्या खिशाला न परवडणारे मात्र अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या दोघांनी मराठी सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यामुळे एक नवीन सुरुवात असे म्हणत या दोघांनी यशाच्या पायरीचा एक टप्पा ओलांडत स्वतःच्या हक्काचं घर खरेदी केलं. नुकतेच त्यांनी या नव्या घराचे विधिवत पूजन करून गृहप्रवेश केलेला पाहायला मिळतो आहे. यावेळी मितालीने सोशल मीडियावर आपल्या या नव्या घराचा फोटो शेअर करून आनंदाचे हे गोड क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावेळी काही जवळच्या नातेवाईक आणि मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. सिद्धार्थ अगोदर ज्या घरात राहत होता त्या घराला निरोप देताना तो आणि मिताली दोघेही खूप भावुक झाले होते. या घराच्या आठवणी सांगताना तो म्हणाला होता की, तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून, नाहीतर एका छोट्या पोतडीत बांधून कायमचं घेऊन गेलो असतो. किती काय काय पाहीलंयस तू. किती काय काय दाखवलंयस तू.

किती लोक, किती प्रेम, किती भांडणं, किती अडचणी, किती आनंद. कित्ती कित्ती आठवणी. स्वप्नात येशील तेव्हा तुझ्याच एका कोपऱ्यात एका भिंतीला डोकं टेकवून बसेन. तुझ्या रंगावरून, फरशीवरून हात फिरवेन. मुटकुळं करून तुझ्या खिडकीशी झोपून जाईन. तेव्हापण असंच थोपट.. जसं इतकी वर्ष केलंस. तुझा वास, तुझी धूळ, मुठीत घट्ट पकडून नेतोय. ज्या नवीन घरात चाललोय त्याला तुझ्या गोष्टी सांगेन. तुझ्या सारखं मिठी मारायला शिकवेन. आमच्यानंतर जे येतील त्यांना असंच प्रेम दे. पण आम्हाला विसरू नकोस. नीट राहा. नीट राहूदे. प्रेम’ अशी एक भावनिक पोस्ट त्याने या घराच्या आठवणीत लिहिली होती. सिध्दार्थला असे भावुक होताना पाहून चाहत्यांनी त्याचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळाले. सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनाही त्यांच्या या नव्या घरात भरभराटी मिळो हीच सदिच्छा.