
बॉलीवूडमध्ये आजवर समाजातील खरया हिरोंचा प्रवास नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आला आहे. बायोपिकच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण यासह खेळातील अशा असामींच्या आयुष्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. बॉलीवूडच नव्हे तर अनेक प्रादेशिक भाषांमधील सिनेमांनीही हा मसाला हिट करून दाखवला आहे. आयुष्यात एकतरी बायोपिक करावा असे कलाकारांनाही वाटत असते. या निमित्ताने पडदय़ावर का असेना पण रिअल हिरोचे जीवन जगण्याची संधी कोणताही कलाकार हातची घालवत नाही. सध्या ही संधी अभिनेता श्रेयस तळपदे याला मिळाली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील हँडसम बिझनेसमॅन यश म्हणून घराघरात पोहोचलेला श्रेयस आता लवकरच मैदानावर सिक्स फोर फटके मारताना दिसणार आहे.

क्रिकेटर प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारीत कौन है प्रवीण तांबे या सिनेमातील श्रेयस साकारत असलेली प्रवीण तांबे यांची भूमिका ही त्याच्या चाहत्यांसाठी ट्रीट असेल. मराठी मालिकेपासून अभिनयाची सुरूवात करणारया श्रेयसने अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेमातही स्थान मिळवलं. विनोदी ढंगाच्या हलक्या फुलक्या सिनेमांसोबतच श्रेयसने इक्बाल या सिनेमात प्रमुख व्यक्तीरेखा साकारत लक्ष वेधलं. आता जेव्हा कौन है प्रवीण तांबे असं म्हणत सिनेमातून तांबे यांचा प्रवास उलगडण्यासाठी श्रेयस उत्सुक असला तरी त्याच्यासाठी क्रिकेटवर आधारीत सिनेमा साकारणे अवघड जाणार नाही कारण त्याच्या गाठीशी इक्बालचा तगडा अनुभव आहे. 2005 साली पडदय़ावर आलेल्या इक्बाल सिनेमात त्याने क्रिकेटमध्ये एन्ट्री घेणारया तरूणाची भूमिका साकारली होती. 17 वर्षांनी पुन्हा श्रेयस क्रिकेटरचे आयुष्य अनुभवणार आहे. अर्थातच अशी संधी कलाकार म्हणून क्वचितच मिळते असं म्हणत श्रेयसलाही या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रवीण तांबे साकारण्यासाठी तांबे यांची भेट घेऊन त्यांच्या खूप गोष्टी निरीक्षणातून टिपल्याचे श्रेयसने त्याच्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितले आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर शेअर करत श्रेयसने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांना दिली आहे. 1 एप्रिलला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेटीला येणार आहे. तर 9 मार्चला ट्रेलर रिलीज होणार आहे. काम करण्याची जिद्द शांत स्वभाव आणि इकबाल चित्रपटाचा अनुभव शिवाय काम करताना घेत काम करणे आणि त्याच सोबत मोठा चाहता वर्ग ह्या सर्व कारणामुळेच श्रेयसला हा चित्रपट साकारायला मिळाला असल्याचं सांगितलं जातंय.

आयुष्यात सगळय़ा गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात तरच यश मिळते या वाक्याला छेद देणारया माणसांपैकी एक असलेले क्रिकेटर प्रवीण तांबे यांची गोष्ट कौन है प्रवीण तांबे या सिनेमातून पडदय़ावर येणार आहे. वयाच्या ज्या वर्षी क्रिकेटवीर मैदानाला रामराम ठोकतात त्या 41 व्या वर्षी प्रवीण तांबे यांनी क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं. राजस्थान रॉयल्स या टीममधून आयपीएल खेळणारया तांबे यांनी वय हा फक्त आकडा असतो… उत्साह तुमच्या मनात असतो हा लाइफ फंडा दिला आणि तोच फंडा श्रेयस अभिनयातून दाखवून देणार आहे. त्यामुळे नेहमीच्या पायवाटेपेक्षा काहीतरी भन्नाट असलेल्या तांबे यांचा प्रवासही तितकाच रंजकपणे या सिनेमात मांडला आहे. कौन है प्रवीण तांबे यासिनेमात तांबे यांच्या 20 वर्षाच्या क्रिकेटरकाळातील प्रवास पहायला मिळणार आहे. मुंबई रणजीपासून त्यांनी खेळायला सुरूवात केली. एकीकडे छोटय़ामोठय़ा नोकरया तर दुसरीकडे क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न असा त्यांचा प्रवास होता. अखेर 2012मध्ये विजय हजारे टुर्नामेंटमधील त्यांची कामगिरी कर्णधार राहुल द्रवीडने हेरली आणि तांबे यांची जयपूर फ्रंचायसीमध्ये वर्णी लागली. त्यानंतर आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघाचा ते भाग बनले. श्रेयस तळपदे या प्रत्येक प्रसंगाला, अनुभवाला प्रवीण तांबे टच देणार आहे.