झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. श्रेयस मराठी चित्रपट आणि मालिकेतून काम करत असतानाच हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळला आणि ईकबाल सारखा तगडा चित्रपट त्याच्या हाती आला. गोलमाल चित्रपटाच्या सिकवल मधून तो विनोदी भूमिका साकारताना दिसला. आता पुन्हा एकदा त्याची पाउले मराठी सृष्टीकडे वळली आहेत. त्याने साकारलेली यशची दिलखुलास भूमिका प्रेक्षकांना देखील खूपच भावली आहे. आज श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांची लव्हस्टोरी नेमकी कुठे जुळून आली होती ते जाणून घेऊयात…

श्रेयस तळपदे ‘आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकेत निशांत महाजनची भूमिका साकारत होता. या मालिकेमुळे श्रेयासला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. याच प्रसिद्धीमुळे त्याला विनायक गणेश वझे महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी जीएस या पदावर दीप्ती देशमुख कार्यरत होती. दिप्तीने श्रेयासला फोनवरून आमंत्रित केले होते दरम्यान दोन ते तीन वेळा त्यांचा फोनवरून संवाद देखील झाला होता. हा कार्यक्रम २१ डिसेंबरला पार पडणार होता त्याच्या अगोदरच दीप्ती तिच्या काही मैत्रिणींसोबत श्रेयसच्या घरी त्याला निमंत्रण देण्यासाठी गेल्या होत्या. दिप्तीला समोर पाहताच श्रेयस तिच्या प्रेमातच पडला. श्रेयसच्या बाबतीत पहिल्या नजरेत झालेले प्रेम असे म्हटले तर वावगे ठरायला नको. कारण २१ डिसेंबरला कार्यक्रमात गेल्यावर श्रेयसची नजर दिप्तीकडेच खिळून राहिली होती. कार्यक्रम आटोपल्यावर दोघांनी एकमेकांना निरोप देखील दिला. परंतु श्रेयासच्या मनात काहीतरी वेगळेच घडत होते. शेवटी न राहवून अवघ्या पाच दिवसातच म्हणजेच २६ डिसेंबरला त्याने दिप्तीची भेट घेतली आणि माझ्याशी लग्न करशील का? असे प्रपोज केले. श्रेयसने प्रपोज करताच दीप्तीला धक्का बसला. एवढ्यात लग्नाचा विचार केला नसल्याचे सांगत आणि अमेरिकेला पुढील शिक्षणासाठी जावे लागणार या विचाराने तिने श्रेयासला साफ नकार दिला होता मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि दोघेही पुन्हा एकत्र भेटू, बोलू लागले.

दरम्यान दिप्तीचे अमेरिकेला जाणेही टळले शेवटी दोन ते अडीच वर्षांनी दिप्तीने श्रेयसला आपला होकार कळवळा. मानसशास्त्र तज्ञ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर दिप्तीने श्रेयसबाबत घरच्यांना सांगितले तेव्हा घरच्यांनी देखील त्यांच्या लग्नाला संमती दिली. लग्नाची तारीख काढायची होती मात्र दिप्तीचे लग्न तिच्या मावशीच्याच मंगल कार्यालयात व्हावे असा हट्ट तिच्या मावशीचा होता. ३१ डिसेंबरला कार्यालय बुक नसल्याने शेवटी याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय पक्का ठरला. ३१ डिसेंबर २००४ साली दीप्ती आणि श्रेयस यांचे मोठ्या थाटात लग्न पार पडले. श्रेयस आणि दीप्ती यांचे लग्न होऊन बरीच वर्षे उलटली तरी देखील त्यांना मूल होत नव्हते. त्यामुळे सरोगेसी द्वारे मूल जन्माला घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दरम्यान श्रेयस आणि दीप्ती परदेशात फिरायला निघाले त्यावेळी त्यांच्या बाळाचा जन्म होणार असल्याचे त्यांना कळले. त्यामुळे आपली फॉरेन ट्रिप रद्द करून ताबडतोब ते दवाखान्यात आपल्या लेकीला पाहायला दाखल झाले. ४ मे २०१८ साली ‘आद्या’चा जन्म झाला.