दोन दिवसांपूर्वी सिल्वासा येथे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील यश आणि नेहाच्या लग्नाच्या सोहळ्याचे चित्रीकरण पार पडले. घोडीवर बसून मोठ्या दिमाखात आणि वाजत गाजत यशची वरात लग्नमंडपात दाखल झालेली पाहायला मिळाली. तुला पाहते रे या मालिकेत ग्रँड वेडिंग पार पडले होते असेच ग्रँड वेडिंग यश आणि नेहाचे देख व्हावे अशी दिग्दर्शकाची ईच्छा होती. त्यामुळे मालिकेच्या दिग्दर्शकाला म्हणजेच अजय मयेकर यांना जशी अपेक्षा होती तशी अपेक्षा पूर्ण करण्याचा या कलाकारांनी पुरेपूर प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. त्यांची ही मेहनत रविवारच्या दोन तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्यात प्रार्थना बेहरे असनी श्रेयस तळपदे यांनी देखील आपली हौस पूर्ण केलेली पाहायला मिळत आहे. या लग्नसोहळ्यात पिंक कलरची थीम असणार हे जेव्हा प्रार्थना बेहरेला कळले त्यावेळी तिने नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. कारण पिंक रंगाची साडी मुलीला चांगली दिसेल पण नवऱ्या मुलासाठी हा कलर योग्य वाटणार नाही असे तिने मत व्यक्त केले होते. मात्र पिंक रंगाच्या कुर्त्यामध्ये जेव्हा श्रेयासचा लूक समोर आला तेव्हा हा कलर त्याच्यासाठी योग्य आहे असा प्रार्थनाने शिक्कामोर्तब केला. प्रार्थनाने स्वतःच्या लग्नात एवढा मेकअप केला नव्हता ती हौस या मालिकेतून करायला मिळाल्याने ती खूपच खुश होती. नऊवारी साडी, हळद, मेहेंदी असा सर्वच थाट तिच्यासाठी नवीन होता त्यामुळे स्वतःच्या लग्नात राहून गेलेली हौस तिने नेहाच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली आहे. तर श्रेयससाठी देखील हा अनुभव खूपच वेगळा होता असे तो म्हणतो. श्रेयसचे स्वतःच्या लग्नात उखाणा घेतला नव्हता त्याची ही हौस या मालिकेतून पूर्ण होणार का हे पाहावे लागणार आहे. अर्थात उखाणा ही माझ्यासाठी मोठी कठीण गोष्ट आहे त्यामुळे मी उखाणा घेण्याचे टाळतो असे तो म्हणतो. श्रेयसची आणखी एक खऱ्या लग्नात राहून गेलेली गोष्ट ती म्हणजे हनिमून.

जेव्हा दीप्ती सोबत श्रेयसचे लग्न झाले त्यावेळी लग्नानंतर लगेचच तो ‘ईकबाल’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघून गेला होता. त्यामुळे हनिमूनसारखी गोष्ट मी माझ्या खऱ्या लग्नात मिस केली असे श्रेयस म्हणतो. अर्थात ईकबाल हा चित्रपट श्रेयसच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा चित्रपट ठरला होता. त्यामुळे लग्नात ही गोष्ट राहून गेली असे तो आवर्जून सांगताना दिसतो. मात्र मालिकेत नेहा आणि यश हनिमूनला नक्की जाणार असल्याचेही तो संकेत देताना दिसतो. गेल्या तीन दिवसांपासून मालिकेची कलाकारांची टीम सिल्वासाला ठाण मांडून आहे. गेल्या तीन दिवसात लग्नसोहळ्याचे चित्रीकरण निसर्गाच्या सानिध्यात पार पडत आहे. मागच्या आठवड्यातही हळद आणि मेहेंदीच्या सोहळ्यात या कलाकारांनी दिवसरात्र शूटिंग पूर्ण केले होते. याशिवाय प्रवास करून सिल्वासाला पोहोचणे आणि परत तीन दिवस शूटिंग करणे हे सर्वच कलाकार तंत्रज्ञ साठी मोठे दिव्याचे काम होते. त्यामुळे भयंकर थकवा आलेला असूनही चेहऱ्यावर टवटवीत पणा टिकवून ठेवूत ही कलाकार मंडळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास पुन्हा एकदा सज्ज झालेली पाहायला मिळाली.