
हिंदी सिनेमा गाजवून बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर आलेल्या श्रेयस तळपदे या मराठमोळ्या अभिनेत्याच्या करिअरची गाडी सध्या सुसाट धावत आहे. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने अभिनेता म्हणून आयुष्यातील पहिलीवहिली गोष्ट शेअर केली आहे. गेल्या वर्षी त्याची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका दाखल झाली आणि आजही ही मालिका खूप गाजत आहे. मालिकेसोबतच श्रेयसच्या हातात सध्या तीन मोठे सिनेमे आहेत जे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. यशाच्या दिशेने जात असताना श्रेयसने नुकताच एक असा फोटो शेअर केला आहे जी अभिनेता म्हणून त्याने केलेली पहिली गोष्ट आहे. हा फोटो पाहून श्रेयस इतकेच त्याचे चाहतेही जुन्या आठवणीत रमून गेले.

त्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो डोर या त्याच्या हिंदी सिनेमातील लूकमध्ये दिसत आहे. या फोटोशी त्याच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. २००६ साली पडद्यावर आलेल्या डोर या सिनेमाने दोन महिलांच्या आयुष्याचा प्रवास दाखवला होता. याच सिनेमासाठी श्रेयसने त्याच्या कलाकार म्हणून आयुष्यातील पहिली लूकटेस्ट दिली होती. माझ्या आयुष्यातील पहिली लूक टेस्ट अशी कॅप्शन देत श्रेयसने फोटोसोबतच मनातील अनेक भावना व्यक्त केल्या आहेत. श्रेयस या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या धोती आणि कुर्ता यामध्ये दिसत आहे. खांद्याला रंगीत कापडाच्या तुकड्यांपासून बनवलेलं गाठोडं अडकवलं आहे. डोक्याला एक साधंसं कापड पगडीसारखं बांधलं आहे. आणि हात कपाळाशी नेऊन कुणालातरी शोधत असल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर आहे. डोर सिनेमातील बहुरूपियाच्या भूमिकेसाठी श्रेयसने पहिल्यांदा लूक टेस्ट दिली तो हा क्षण असल्याचं त्यानं सांगितलं आहे. श्रेयसने असं लिहिलं आहे की, २००६ या काळात स्त्रीप्रधान सिनेमा बनवण्याचं पाऊल डोर या सिनेमाच्या टीमने टाकलं. मी या सिनेमाचा एक भाग होतो याचा खूप् आनंद आहे.

गुल पनाग आणि आयेशा टाकिया यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. दोन महिलांच्या जीवनप्रवासातील मी एक धागा होतो. माझी भूमिका छोटी असली तरी खूप महत्वाची होती. डोरमधल्या माझ्या भूमिकेनेच मला शिकवलं की कोणतीही भूमिका किती लहान आहे, मोठी आहे ही गोष्ट गौण असते. भूमिकेच्या स्क्रिनटाइमपेक्षा कलाकार म्हणून ती आपण किती जगतो हे महत्वाचं आहे. डोर सिनेमासाठी दिलेली आयुष्यातील पहिली लूक टेस्ट आणि सिनेमाचा तो सगळा अनुभव याला आज या गोष्टीला १६ वर्षे झाली. श्रेयस सध्या यशवर्धन चौधरी बनून प्रेक्षकांना रोज भेटत आहेच. लवकरच तो इमर्जन्सी या सिनेमात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आपडी थापडी हा त्याचा नवा मराठी सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. रंगीलागर्ल ऊर्मिला मातोंडकरसोबतही श्रेयस मोठ्या पडदयावर झळकणार आहे.