अभिनेता शशांक केतकर याची पत्नी प्रियांका केतकर हिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आजच तिने सोशल मीडियावरून या नव्या व्यवसायाची बातमी दिली आहे. तसं पाहिलं तर शशांक केतकर अभिनयासोबतच आईच्या गावात या नावाने पुण्यातील कोथरूड परिसरात एक हॉटेल देखील चालवत होता. या हॉटेलची जबाबदारी शशांकच्या अनुपस्थितीत त्याची आई, वडील आणि पत्नी प्रियांका सांभाळत होती. शशांकने होणार सून मी ह्या घरची मालिकेतून भरपूर लोकप्रियता मिळवली होती त्यामुळे शशांकचे हॉटेल आहे कळताच अंडक खवय्ये या ठिकाणी येऊन तिथल्या पदार्थांची चव चाखत होते. परंतु २०१९ साली काही कारणास्तव शशांकने हे हॉटेल बंद करत असल्याचे जाहीर केले होते. शशांक हॉटेल बंद करतोय असे म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांनी हॉटेल बंद करू नकोस अशा सूचना दिल्या होत्या. मात्र यापुढे हे हॉटेल चालवणे त्याला शक्य नसल्याचे त्याने सांगितले होते.

शशांक आणि प्रियांका २०१७ साली विवाहबद्ध झाले होते. प्रियांका ने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. फेब्रुवारी महिन्यात शशांक आणि प्रियांकाला पुत्ररत्न प्राप्ती झाली. शशांकने आपल्या मुलाचे नाव ‘ऋग्वेद’ असल्याचे जाहीर करून ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. मुलाच्या जन्मानंतर साधारण सहा महिन्यांनी प्रियांका आता नव्याने स्वतःला व्यवसायात उतरवू पाहत आहे. दोन दिवसांपूर्वी नुकताच नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे तिने सोशल मीडियावरून कळवले होते. “Rainbow Twinkles” या नावाने तिने स्वतःचे आर्टस् अँड क्राफ्टस स्टोअर सुरू केले आहे. प्रियांकासह शशांकने ही आनंदाची बातमी नुकतीच चाहत्यांसोबत शेअर केली असून आमच्या या नव्या व्यवसायाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज असल्याचे म्हटले आहे. शशांक सध्या पाहिले न मी तुला या मालिकेत काम करत आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेचे शूटिंग देखील पूर्ण झाले असल्याने लवकरच तो आता एका नव्या मालिकेतून पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. रेनबो ट्विनकल्स या नव्याने सुरू झालेल्या त्यांच्या व्यवसायात शशांक आणि प्रियांकाला निश्चित असे यश मिळो हीच सदिच्छा….