
गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वहिनी टीआरपीच्या बाबतीत अग्रेसर ठरलेली पाहायला मिळत आहे. झी मराठी वहिनीला मागे टाकून स्टार प्रवाह वाहिनी आता हळूहळू प्रेक्षकांच्या घरात राज्य निर्माण करताना दिसत आहे. आणि म्हणूनच या वाहिनीवर नव्या मालिकांची एन्ट्री केली जात आहे. पिंकीचा विजय असो या नव्या मालिकेसोबतच आता स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक मालिका दाखल होत आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून सोमवार ते शनिवार दुपारी १.३० वाजता ‘मुरंबा’ ही मालिका प्रसारित होत आहे.

या नव्या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर स्टार प्रवाह वाहिनीवर झळकत असल्याने त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शशांक केतकरसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण याबाबत जाणून घेऊयात… मुरंबा या नव्या मालिकेत शशांक केतकर सोबत अभिनेत्री शिवानी मुंढेकर झळकणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच वाहिनीने रिलीज केला आहे ज्यात शशांक एका मुलीला धडकतो पण तो तिला बोलतो हे पाहून त्या मुलीची मैत्रीण येते तिला पाहून मालिकेचा नायक त्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतो मात्र हा नायक ज्या मुलीला धडकलेला असतो तीही नायकावर भाळलेली पाहायला मिळते त्यामुळे प्रेमाचा हा आंबट गोड मुरंबा कसा मुरणार?…हे प्रेक्षकांना मालिकेतून पाहायला मिळणार आहे. नायकाच्या प्रेमात पडलेल्या नायिकेची भूमिका शिवानी मुंढेकर साकारत आहे. शिवानी मुंढेकर ही मूळची कराडची. इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ती सहभागी व्हायची. नृत्याची तिला विशेष आवड आहे.

गेल्या काही वर्षांपासून रील स्टार म्हणून सोशल मीडियावर शिवानीला मोठी प्रसिद्धी मिळत आहे. तिचे बरेचसे रील व्हिडीओज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसले आहेत. यातूनच शिवानीला मालिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली आहे. या प्रसिद्धीतून तिने काही साड्यांच्या ब्रॅण्डसाठी तसेच काही नामवंत प्रॉडक्टसच्या जाहिरातीदेखील केल्या आहेत. मुरंबा या मालिकेतून शिवानी छोट्या पडद्यावर झळकणार आहे. मालिकेच्या नायकावर असणारे तिचे प्रेम नायकाला कधी समजणार याची उत्कंठा मालिकेच्या प्रोमोमधूनच निर्माण झाली आहे. त्यामुळे या मालिकेत तिची भूमिका काय असेल हे स्पष्ट झाले आहे. शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्यासोबत आणखी कोणकोणते कलाकार या मालिकेत झळकणार आहेत हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास शिवानी मुंढेकर हिला तिच्या पहिल्या वहिल्या मालिकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…