अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री रसिका सुनील ही जोडी एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पण कोणत्या मालिका, वेबसीरीज किंवा सिनेमात नव्हे तर हे दोघे आमनेसामने येणार आहेत रंगभूमीवर. अमेरिकेतील बृहन् महाराष्ट्र मंडळ संमेलनात सादर होणाऱ्या आमनेसामने नाटकात शशांक आणि रसिका एकत्र दिसणार आहेत. शशांकने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत मी आणि रसिका आमनेसामने येणार आहोत असं सांगितलं आहे. आता यांचं काय भांडण झालं आहे का, किंवा कुठल्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही जोडी ऑनस्क्रिन येणार आहे का असे हज्जार प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आदळले.

त्यात गेल्या काही दिवसांपासून शशांक उत्सुकता ताणवत, मी तुम्हाला सरप्राइज देणार आहे असं म्हणत होता. आता याचा उलगडा झाला असून शशांक आणि रसिका चक्क अमेरिकेत आमनेसामने येणार आहेत आणि लिव्ह इन रिलेशनशीप यावर आजच्या तरूणाईचं मत मांडणार आहेत अर्थात आमनेसामने या नाट्यप्रयोगातून. सध्याची तरूणाई लग्नसंस्थेकडे बंधन म्हणून पाहू लागली आहे. त्याऐवजी लिव्ह इन रिलेशनशीप हा नवा ट्रेंड आला आहे. ठरवून लग्न केलेली आणि ते लग्न शेवटपर्यंत टिकवणारी एक पिढी आणि आज लग्नं न करता लिव्ह इन मध्ये राहू, पटलं तर पुढे जाऊ असं म्हणणारी तरूण पिढी जेव्हा एकाच कुटुंबात असते तेव्हा काय होऊ शकतं हा विषय आमनेसामने या नाटकातून मांडला आहे. या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. लीना भागवत, मंगेश कदम, रोहन गुजर आणि मधुरा देशपांडे यांच्या अभिनयाने हे नाटक सजलं आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून अमेरिकेतील बृहन् महाराष्ट्र मंडळाचं संमेलन झालं नव्हतं. यंदा ११ ते १४ ऑगस्ट या कालावधीत हे संमेलन होणार आहे. याच संमेलनासाठी आमनेसामने या नाटकाची निवड झाली आहे.

अमेरिकेत सादर होणाऱ्या प्रयोगासाठी रोहन गुजर ऐवजी शशांक केतकर तर मधुरा देशपांडे ऐवजी रसिका सुनील या नाटकात दिसणार आहेत. शशांक आणि रसिका यांची केमिस्ट्री जुळावी यासाठी मुंबईत दोन प्रयोगही होणार आहेत. शशांक सध्य मुरांबा या मालिकेत अक्षयची भूमिका साकारत आहे यापूर्वी शशांकने गोष्ट तशी गमतीची आणि कुसुम मनोहर लेले या नाटकात काम केले. गोष्ट तशी गमतीची या नाटकात लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासोबत त्याची केमिस्ट्री जुळलेली होती . माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया ही भूमिका करून लोकप्रिय झालेल्या रसिका सुनीलने लग्न करून सध्या अमेरिकेत संसार थाटलाय .नुकतच तिने नवऱ्यासोबत हॉट फोटोसेशन करून कपल गोल्स देत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता .पण आता नाटकाच्या निमित्ताने ती पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाली आहे .