अभिनेत्री केतकी चितळे आणि तिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर केलेली आक्षेपार्ह पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. सध्या केतकी पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्याविरोधात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार टीका होत आहे. ती पोस्ट माझी नाही तर मी फॉरवर्ड केली आहे असं म्ह्णत केतकीने तिची बाजू मांडली. इतकच नव्हे तर ती पोस्ट डिलीट करणार नाही असं म्हणत केतकी तिच्या भूमिकेवर ठाम आहे. केतकीच्या या वर्तनावर कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांनी केतकी प्रकरणी एक महत्त्वाचं विधान करत लक्ष वेधलं आहे.

मी नथुराम गोडसे बोलतोय, विनायक दामोदर सावरकर या सारख्या कलाकृतींमधून रसिकांसमोर आलेले शरद पोंक्षे हेदेखील आजपर्यंत अनेकदा वादग्रस्त विषय किंवा विधानांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टवरून त्यांनाही टीकेला सामोरं जावं लागलं आहे. पण, त्यांनी कधीच त्यांचं विधान मागं घेतलं नाही. त्यामुळेच केतकीच्या प्रकरणात शरद पोंक्षे यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. शरद पोंक्षे यांनी एका दैनिकाशी बोलताना असं म्हटलं आहे की, मी केतकीची फेसबुक पोस्ट वाचली. तिने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह आणि त्यांच्या शारीरीक व्यंगावर भाष्य करणारा मजकूर शेअर केला आहे. तिने शेअर केलेली कविता ही अन्य कुणा व्यक्तीची आहे. केतकीने जे केले आहे ते चुकीचेच आहे. ती असं म्हणते की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर ते शंभर टक्के मान्य, मात्र त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन मर्यादा ओलांडणे हे योग्य नाही. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असताना आपण हा विचार केलाच पाहिजे की आपण जे शेअर करत आहोत किंवा स्वत: पोस्ट करत आहोत ते योग्य आहे की नाही? केतकीविषयी शरद पोंक्षे म्हणाले, केतकी अजून खूप तरूण आहे. तिच्यासमोर तिचं अख्खं आयुष्य आहे.

त्यामुळे तिला तिच्या चुकीची जाणीव करून देत एक संधी दिली पाहिजे. केतकीने काही फार मोठा गुन्हा केलेला नाही. तिला सुधारण्याची संधी दिली तर तिचं करिअर आणि भविष्य भरकटणार नाही याचा विचार करण्याची गरज आहे. केतकीने केलेली पोस्ट राजकीय व्यक्तीशी संबंधित असली तरी केतकीच्या सध्याच्या प्रकरणात राजकारण न आणता या समस्येची सोडवणूक केली पाहिजे. विनायक दामोदर सावरकर या कलाकृतीविरोधातही खूप आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर आल्या असून मी त्यांच्याविरोधात तक्रारा दाखल करणार आहे असं पोंक्षे म्हणाले. सोशल मीडियावर जशी पोस्ट करताना किंवा शेअर करताना विचार केला पाहिजे त्याचप्रकारे एखाद्याच्या कलाकृतीविषयी जाणून न घेता आपली प्रतिक्रिया देतानाही विचार केला पाहिजे असं मत पोंक्षे यांनी मांडलं.