एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून आणि एकनाथ शिंदेकडून एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. या राजकीय घडामोडी चालू असतानाच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक नुकतेच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शरद पोंक्षे यांना कॅन्सरचे निदान झाले होते त्यावर यशस्वीपणे उपचार करून ते मराठी सृष्टीत पुन्हा एकदा सक्रिय झाले. दुसरं वादळ हे त्यांचं दुसरं लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात शरद पोंक्षे यांनी कॅन्सरकाळात अनेक कठीण प्रसंगांना कसे तोंड दिले कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि शरद पोंक्षे यांचा एक फोटो या पुस्तकात छापण्यात आला आहे.

या कठीण प्रसंगात त्यांनी जी मदत केली त्याचा उल्लेख या पुस्तकात त्यांनी केला आहे.’हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला . म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले’ अशा आशयाची एक सविस्तर पोस्ट या पुस्तकाच्या निमित्ताने शरद पोंक्षे यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवरून आदेश बांदेकर मात्र आता चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत. ‘हा शरद तूच ना?’ असे म्हणत आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॅन्सरच्या उपचारानंतर शरद पोंक्षे यांनी मीडियाला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शरद पोंक्षे यांनी या कठीण काळात कोणी कोणी मदत केली याचा उल्लेख केला आहे या मुलाखतीत शरद पोंक्षे म्हणतात की, ‘ सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर…आदेश म्हणाला काळजी करू नकोस तू, नांदेकरां कडं मला आदेशने पाठवलं होतं. मी आदेशला फोन केला की असं असं सांगतायेत रे, अशी शक्यता आहे. तर काय करू मलातर टेन्शन आलंय.

तो म्हणाला की तुला नांदेकर यांच्याकडे पाठवतो , हिंदू कॉलनीमध्ये नांदे डॉक्टर आहेत मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे पाठवलं, तिथून सगळी प्रोसेस सुरू झाली. आदेशामुळे उद्धव ठाकरेंना कळलं…उद्धव ठाकरेंचा लगेच फोन आला. शरद काळजी करू नकोस शिवसेना आणि मी अख्खी शिवसेना तुझ्या पाठीशी उभी आहे. पैशापासून कसलीच काळजी करायची नाही….’ असा हा व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी शेअर करून शरद पोंक्षे यांना धारेवर धरून ‘ हा शरद पोंक्षे तूच ना?’ अशी खोचक टीका केली आहे. आदेश बांदेकर गेल्या काही दिवसांपासून महामिनिस्टरच्या कार्यक्रमात व्यस्त होते. या कार्यक्रमातून वेळ मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणाकडे पाऊल वळवले आणि शरद पोंक्षे यांना त्यांच्या या बोलण्याची आठवण करून देत मुद्द्यावरच घाव घातला आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मदत मिळाली असतानाही ते आपल्या पुस्तकात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख का करतात हे आदेश बांदेकरांना न उलगडणारे कोडे पडले आहे.