
सध्या अनेक कलाकारांच्या सोशल मीडियावर परदेशवारीचे फोटो चाहत्यांना पहायला मिळत आहेत. कुणी भटकंती करायला जातं तर कुणी नाटकाच्या प्रयोगांसाठी किंवा शूटिंगसाठी परदेशाची वाट धरतं. कारण काहीही असो मराठी कलाकारांच्या वाढत्या परदेशदौऱ्यांमुळे त्यांचे चाहतेही खुश असतात बरं का. लवकरच अभिनेता लेखक दिग्दर्शक कवी असा हरहुन्नरी कलाकार संकर्षण कऱ्हाडे यांच्या सोशल मीडियावर लंडनचे फोटो आणि व्हिडिओ दिसणार आहेत. बॅग भरून एअरपोर्टवर दाखल झालेल्या संकर्षण कऱ्हाडे याने दोस्तानो, लंडनला जाऊन येतो असं म्हणत चाहत्यांच्या शुभेच्छांची भेट मागितली आहे. अर्थातच संकर्षणला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या संकर्षण मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये मुशाफिरी करताना दिसतोय. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील त्याची समीरची दिलखुलास भूमिका चांगलीच गाजतेय. समीर आणि शेफाली या जोडीवर चाहते फिदा आहेत. तर दुसरीकडे किचन कल्लाकार या शोचं निवेदनही संकर्षण करत आहे. छोट्या पडद्यावर तर संकर्षणने चौकार मारले आहेतच पण नाटक हा त्याचा खास प्रांत असल्याने रंगभूमीवरही संकर्षण दोन नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत आहे. तू म्हणशील तसं या नाटकात तो स्वत: काम करत आहे आणि सारखं काहीतरी होतय या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा त्याच्याकडे आहे. तू म्हणशील तसं या नाटकाचे गेल्या पाच वर्षापासून प्रयोग सुरू आहेत. या नाटकात संकर्षण सोबत भक्ती देसाईची मुख्य भूमिका आहे. तर सारखं काहीतरी होतंय हे नाटक काही दिवसांपूर्वीच रंगमंचावर आलं आहे. अभिनेते प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांची जोडी ३६ वर्षांनी पुन्हा नाटकात एकत्र आली ती सारखं काहीतरी होतय या नाटकातून. या नाटकात संकर्षण दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहे.

संकर्षणच्या लंडनवारीसाठी ही दोन्ही नाटकच कारणीभूत आहेत. या दोन्ही नाटकाचे दोन दोन प्रयोग लंडनमध्ये होणार आहेत. त्यासाठीच संकर्षण लंडनला रवाना झाला. मूळचा परभणीचा असलेला संकर्षण कऱ्हाडे गेल्या २० वर्षापासून मनोरंजनक्षेत्रात आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण या रिअॅलिटी शोमधून संकर्षणने लक्ष वेधून घेतलं. नाटक, मालिका, रिअॅलिटी शो यामध्ये संकर्षणने आजपर्यंत काम केलं आहे. तो एक संवेदनशील कवीही आहे. देवा शप्पथ या मालिकेत त्याने नायक म्हणूनही भूमिका केली होती. नाटकाशी विशेष प्रेम असलेल्या संकर्षणसाठी सारखं काहीतरी होतंय आणि तू म्हणशील तसं ही दोन्ही नाटकं खास आहेत. त्यामुळेच लंडनमध्ये या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. संकर्षण एक उत्तम कलाकार आहेच शिवाय व्यक्ती म्हणूनही चांगला आहे तो पुढे अशीच प्रगती करत राहो हीच सदिच्छा..