संकर्षणाच्या डायरीच्या पानावर संकर्षण गेल्या ५ वर्षांपासून या दोन खास व्यक्तींच्या सह्या घेत असतो

सारखं काहीतरी होतंय या नाटकातून संकर्षण कऱ्हाडे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. या निमित्ताने मराठी सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. किचन कल्लाकार, माझी तुझी रेशिमगाठ आणि तू म्हणशील तसं या रिऍलिटी शो, मालिका आणि नाटकातून संकर्षण व्यस्त असलेला पाहायला मिळतो आहे. या व्यस्त शेड्युलमध्ये तो आपल्यासोबत काही खास वस्तू कॅरी करताना दिसतो. याबाबत नुकताच त्याने एक खुलासा केला आहे, अर्थात जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली या अत्यंत महत्वाच्या गोष्टींसोबत संकर्षणच्या बॅगमध्ये एक डायरी असते.

ही डायरी त्याला एका मित्राने भेट म्हणून दिलेली आहे. या डायरीच्या पानावर संकर्षण गेल्या ५ वर्षांपासून दोन खास व्यक्तींच्या सह्या घेत असतो. या दोन खास व्यक्ती म्हणजे प्रशांत दामले आणि स्वतः संकर्षणचे वडील. प्रशांत दामले यांची डायरीच्या पहिल्या पानावर सही असून त्यावर एक मेसेज देखील लिहिलेला आहे. ‘शिस्तीत राहायचं’…हा मेसेज देऊन त्यांनी संकर्षणला या व्यस्त कामकाजात जमिनीवरच राहण्याचा सल्ला दिलेला पाहायला मिळतो. तर वडिलांनी त्यांच्या सहिखाली खूप मोठा हो असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन खास व्यक्ती माझ्यासाठी नेहमीच पाठीशी उभे असणारे आहेत असे संकर्षण म्हणतो. साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या वेळी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी संकर्षणला एक बास्केट भेट म्हणून दिलेली होती. ह्या बास्केटमध्ये जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली तो नेहमी सेटवर सोबत घेऊन येत असतो. त्यामुळे ही बास्केट माझ्यासाठी खूप खास आहे असे संकर्षण सांगतो.

पाण्याची बाटली मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांची आहे पण मी ही बाटली त्यांच्याकडून मागे लागून घेतली .परंतु त्यांनी ती बाटली देण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली होती हे तो आवर्जून सांगताना दिसतो. संकर्षणला वाचनाची देखील खूप आवड आहे त्यामुळे आपल्यासोबत तो बॅगमध्ये नेहमी पुस्तकं बाळगत असतो. यात त्याला मित्रांकडूनही अनेक पुस्तकं भेट स्वरूपात मिळालेली आहेत. वेळात वेळ काढून पुस्तक वाचणे हे त्याचे आवडते काम आहे. मालिकेतला संकर्षणचा सहजसुंदर वावर खऱ्या आयुष्यात देखील तितकाच सरस आहे आणि म्हणूनच त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. आयुष्यातल्या या साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी खूप काही शिकवून जातात आणि आपल्याला पाय जमिनीवर ठेवायला मदत करतात हेही सांगायला तो विसरत नाही.