झी मराठीवरील किचन कल्लाकारच्या मंचावर ह्या आठवड्यात चिमुकल्यांची जबरदस्त धमाल मस्ती पाहायला मिळते आहे. तुझ्यात जीव रंगला मधील लाडू म्हणजेच राजविरसिंह , शौर्या वसईकर, रेणुका देशपांडे या बालकलाकारांनी सेटवर धमाल केलेली पाहायला मिळाली. तर संजय नार्वेकर, संजय मोने यांनी देखील किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावून आठवणींना उजाळा देताना दिसले. संजय मोने यांनी बालपणीचा पिठलं बनवण्याचा एक किस्सा शेअर केला. भात कसा बनवायचा याचा अंदाज होता तर त्याच्यासोबत खायला पिठलं बनवायचं त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य जवळ घेतलं.

पहिल्यांदा पिठलं पातळ झालं मग अजून पीठ टाकलं तर ते दगडासारखं झालं म्हणून अजून पाणी ओतलं. साधारण पाच जणांसाठी बनवायला घेतलेलं पिठलं २५ माणसांना पुरेल इतकं झालं त्यामुळे तीन दिवस पिठलंच खात राहिलो. हा किस्सा ऐकताना मात्र प्रेक्षकांना देखील मज्जा आली. संजय नार्वेकर यांनी वास्तव चित्रपटात देडफुटयाची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यांना कशी मिळाली आणि संजय दत्त यांच्यासोबतचा अनुभव कसा होता हे श्रेयाने विचारले होते. संजय नार्वेकर यांनी ही आठवण सांगताना मला खुर्ची कशी मिळाली हे देखील सांगितले. रुईया नाक्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो तेव्हा त्यावेळेला मोबाईल नव्हता पेजर होता महेश मांजरेकर यांचा कॉल आला आणि त्यांनी मढला एका बंगल्यावर बोलावलं. तेव्हा एका तासात कसाबसा मढला त्या बंगल्यावर पोहोचलो.तिथे गेल्यावर मला कपडे घातले आणि एक सिन शूट केला. त्यावेळेस सिन शूट झाल्यावर ते फुटेज लॅबमध्ये नेले जायचे आणि चेक करायचे की तो सिन चांगला झालाय की नाही.

हा शॉट पाहून महेश मांजरेकर, संजय दत्त आणि निर्मात्या टीमने आपली पसंती दर्शवली. संजय नार्वेकर त्यावेळेला एका कोपऱ्यात पायरीवर बसून चहा पित होते. तिकडून संजय दत्त त्यांच्या स्टाईलमध्ये आले आणि त्यांनी मला पायरीवर चहा पिताना पाहिले. जवळ येऊन तू काय छान काम केलंस म्हणून हात मिळवून मी तुमचा सिन पाहिला काय भारी काम केलंय हे मी महेश जवळ बोललो असे म्हणून कौतुक करु लागले. त्यानंतर संजय दत्त यांनी मॅनेजरला हाक मारली आणि याच्यापुढे हे जर इथे खाली बसलेले दिसले ना तर मी काय करेल माहिती आहे ना?.. यांना खुर्ची मिळाली पाहिजे आणि चहा सुद्धा मिळाला पाहिजे इथून पुढे हे मला खाली बसलेले नाही दिसले पाहिजे. त्या दिवसापासून मला खुर्ची मिळायला लागली…अस संजय नार्वेकर आवर्जून सांगताना दिसले.