सोशल मीडियावर चांगल्या वाईट अशा सर्वच गोष्टी व्हायरल होताना दिसतात. मात्र त्या गोष्टीमागचे सत्य जाणून घेण्याची तसदी खूप कमी जणांनी घेतलेली पाहायला मिळते. अशा घटना किंवा प्रसंग सर्रास पणे शेअर देखील करण्यात येतात यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते. असाच काहीसा प्रसंग मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याबाबत घडलेला पाहायला मिळतो आहे. सचिन पिळगावकर हे नाव मराठी सृष्टीतील एक मोठं नाव आहे. दिग्दर्शनासोबतच सचिन पिळगावकर यांनी अभिनय तसेच गायन क्षेत्रातही आपले नाव कमावले आहे.

मराठी चित्रपट सृष्टीला सचिन पिळगावकर यांनी अनेक हिट चित्रपट दिले. अशी ही बनवाबनवी, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, माझा पती करोडपती अशी त्यांची कलाकृती असलेली बरीच नावे घेता येतील. मराठी सृष्टीसोबतच सचिन पिळगावकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी हिंदी मालिका सृष्टीतून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे हिंदी सृष्टीतही सचिन पिळगावकर यांना मानाचे स्थान आहे. नच बलीये या डान्स रिऍलिटी शोच्या पहिल्या वहिल्या सिजनमध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी सहभाग दर्शवला होता. या सिजनचे ते विजेते ठरले होते. त्यामुळे अनेक हिंदी रिऍलिटी शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते. हिंदी सृष्टीमुळे सचिन पिळगावकर हे नाव सर्वदूर पसरले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हिंदीभाषिक खाजगी वृत्त मध्यमातून सचिन पिळगावकर यांच्या निधनाची बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांचा एक फोटो आणि निधन झाल्याचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कुठलीही शहानिशा न करताच भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केलेली पाहायला मिळते आहे. सचिन पिळगावकर यांच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर एकच खळबळ माजलेली पाहायला मिळाली. मात्र काही जाणकार प्रेक्षकांनी ही बातमी अफवा असल्याचा खुलासा केला आहे. अर्थात सचिन पिळगावकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेले पाहायला मिळतात. चार दिवसांपूर्वीच सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या निधनाची बातमी ही एक केवळ अफवा आहे हे आता हिंदी प्रेक्षकांना देखील कळून चुकले आहे. त्यामुळे अनेकांनी या बातमीवर आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला.